T20 World Cup 2022: धक्कादायक पराभवानंतर अखेर श्रीलंकेची टीम पहिली मॅच जिंकली
T20 World Cup 2022 मध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंकेला आजच्या मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक होतं.....
गीलाँग: टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World cup) मध्ये श्रीलंकेची खराब सुरुवात झाली होती. सलामीच्या सामन्यात दुबळ्या नामीबियाने श्रीलंकेला (Srilanka) पराभूत केलं होतं. याच श्रीलंकेने आज दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. दसुन शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने UAE च्या टीमवर मोठा विजय मिळवला. श्रीलंकेने UAE वर 79 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 152 धावा केल्या.
विजयात कोणाची महत्त्वाची भूमिका?
प्रत्युत्तरात यूएईचा डाव 73 धावात आटोपला. श्रीलंकेच्या विजयात त्यांचे ओपनर पथुम निसंका आणि गोलंदाज दुष्मंता चमीरा, वानेंदु हसारंगा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दोघांनी मिळून 6 विकेट काढल्या
पथुम निसंकाने अर्धशतक झळकावलं. त्याने 60 चेंडूत 74 धावा फटकावल्या. दुष्मंता चमीराने 15 धावा देऊन 3 विकेट काढल्या. लेग स्पिनर हसारंगाने 8 धावात 3 विकेट काढल्या. हसारंगा आणि चमीराने 23 धावात UAE च्या 6 विकेट काढल्या.
ग्रुप ‘ए’मध्ये पहिल्या स्थानावर कोण?
श्रीलंकेने या विजयासह खात उघडलं आहे. ग्रुप ए मध्ये एक विजय आणि एका पराजयासह श्रीलंकेची टीम तिसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँडसची टीम सलग दोन विजयासंह पहिल्या स्थानावर आहे. नामीबियाची टीम दुसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेची फ्लॉप फलंदाजी
यूएईच्या टीमने टॉस जिंकून श्रीलंकेला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. ओपनर कुसल मेंडिस आणि निसांकाने 42 धावांची सलामी दिली. कुसल मेंडिस 18 धावांवर आऊट झाला. धनंजय डीसिल्वाने यूएईच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 3 चौकार आणि एका षटकारासह 33 धावा फटकावल्या. ही जोडी फुटल्यानंतर श्रीलंकेची मीडल ऑर्डर कोसळली.
मयप्पनची हॅट्रिक
यूएईचा लेग स्पिनर मयप्पनने 15 व्या ओव्हरमध्ये कहर केला. मयप्पनने तीन चेंडूत तीन विकेट घेऊन हॅट्रिक घेतली. त्याने भानुका राजपक्षे, असालंका आणि शनाकाचा विकेट घेतला. श्रीलंकेच्या टीमने 152 धावा केल्या.