तेव्हा प्रत्येक दिवस वाढदिवस असतो, विराट कोहलीच्या शतकावर जडेजा असं का म्हणाला
Ravindra Jadeja on Virat : भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा याने विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने ४९ वे शतक झळकवात सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. भारताने वर्ल्डकपमध्ये सलग आठवा विजय मिळवला आहे.
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 मध्ये सलग 8 वा विजय मिळवला आहे. विराट कोहलीने 101 धावांची खेळी केली. ईडन गार्डन्सवर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय मिळवला. भारताने याआधी श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात जडेजाने 15 चेंडूत 29 धावा देत 5 विकेट घेतले. विराट कोहलीने त्याच्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.
कोहलीच्या शतकावर जडेजा काय म्हणाला?
भारतीय संघाच्या विजयानंतर रवींद्र जडेजाने प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘जेव्हा आम्ही भारतीय जर्सी घालून खेळतो तेव्हा प्रत्येक दिवस वाढदिवस असतो. कारण ही जर्सी घालण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. वाढदिवसाच्या दिवशी कोणी संघाला विजय मिळवून देत असेल तर यापेक्षा चांगले काय असू शकते?
सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांची बरोबरी करण्याच्या कोहलीच्या विक्रमाबद्दल तो गंमतीने म्हणाला, ’49 किंवा 50 काहीही असले तरी ताटात तूप पडत आहे, हे महत्त्वाचे आहे. विश्वचषक भारतात होत आहे त्यामुळे विक्रम करत राहणे आमच्यासाठी चांगले आहे.
‘विराटसाठी हे एक खास शतक असेल कारण या विकेटवर स्ट्राईक रोटेट करणे, चौकार मारणे आणि नाबाद राहणे ही मोठी कामगिरी होती.
तू तुझ्या कामगिरीबद्दल काय सांगशील?
आपल्या कामगिरीबद्दल तो म्हणाला, ‘गेल्या तीन-चार सामन्यांमध्ये मी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये योगदान देत आहे. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये योगदान दिल्याने आगामी सामन्यांसाठी आत्मविश्वास वाढला आहे. कठीण परिस्थितीत 30-40 धावा करणे आणि गोलंदाजीतील भागीदारी तोडणे ही अष्टपैलू खेळाडूची भूमिका असते. संघाच्या गरजेनुसार मी प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मी क्षेत्ररक्षणाला कधीच हलके घेत नाही.