रिषभ पंतच्या तब्येतीविषयी सौरव गांगुलीने दिली मोठी अपडेट
रिषभची तब्येत आता व्यवस्थित आहे. तो जलद वेगाने रिकव्हर होतोय, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली आहे.
मुंबई : भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका तोंडावर आलेली असताना भारतीय संघात कोरोनाने एन्ट्री मिळवली. भारताचा विकेट कीपर फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आलं आणि तमाम भारतीय क्रिकेट फॅन्सला धक्का बसला. फॅन्सना रिषभची काळजी वाटू लागली. मात्र रिषभची तब्येत आता व्यवस्थित आहे. तो जलद वेगाने रिकव्हर होतोय, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली आहे.
काय म्हणाला सौरव गांगुली?
आयपीएल स्पर्धा सुरु असताना बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. आता इंग्लंड दौऱ्यातही दोन भारतीय क्रिकेटपटूंना कोरोना झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात आणि फॅन्समध्ये चिंतेंचं वातावरण आहे. अशातच रिषभची तब्येत अगदी व्यवस्थेत आहे. त्याच्या तब्येतीची काहीही चिंता करण्याचं कारण नाही. तो वेगाने रिकव्हर होतोय, अशी माहिती सौरव गांगुलीने दिली आहे.
पंतवर सोशल मीडियातून टीका, बचावासाठी गांगुली मैदानात
रिषभ पंतने यूरोपियन चॅम्पियनशीप सामन्यासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर मास्क नव्हतं. आयपीएलचा अनुभव असतानाही खेळाडू दक्षता घेत नाही, असं निदर्शनास आल्यानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनी रिषभचा काळजीपोटी समाचार घेतला. मात्र रिषभच्या बचावासाठी आता खुद्द ‘दादा’ मैदानात उतरला आहे.
प्रत्येक वेळी तुम्हाला मास्क लावणं शक्य नाही. आम्ही आताच यूरोपियन चॅम्पियनशीप आणि विम्बल्डनच्या मॅचेस पाहिल्या. आता भरपूर नियम बदलले आहेत. ते लोक अजूनही सुट्टीवर आहेत. मग प्रत्येक वेळी मास्क लावणं शक्य आहे का? तर नाही… प्रत्येक वेळी मास्क लावणं शक्य नाहीय, असं रिषभचा बचाव करताना सौरव म्हणाला. तो ‘नेटवर्क 18 ‘शी बोलत होता.
रिषभला कोरोनाचा संसर्ग कसा झाला
रिषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचा संसर्ग झाला आहे. दरम्यान हा संसर्ग झाला कुठे? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. ज्यात पंत मित्रांसोबत युरो चषकाचा फुटबॉल सामना पाहायला गेला त्याचठिकाणी बाधा झाल्याची सर्वाधिक चर्चा आहे. पण सत्य काहीतरी वेगळच असून पंत आणखी एका ठिकाणी गेला होता जिथे त्याला कोरोनाची लागण झाल्याची दाट शक्यता आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने छापलेल्या एका रिपोर्टनुसार पंतला संक्रमण होण्याचं ठिकाण कोणतंही असू शकतं. पण संक्रमण होण्याआधी तो इंग्लंडमध्ये एका डेंटिस्टकडे गेला होता आणि त्याच ठिकाणी त्याला कोरोनाची बाधा झाल्याची दाट शक्यता आहे. 8 जुलैला पंतला कोरोनाची बाधा झाली असून तो तेव्हापासून इंग्लंडमध्येच एका नातेवाईकाच्या घरी विलगीकरणात आहे. TOI च्या रिपोर्टनुसार पंत 5 आणि 6 जुलैला डेंटिस्टकडे गेला होता. त्यानंतर 7 जुलैला संघातील इतर खेळाडूंसोबत तो लंडनमध्ये लशीचा दुसरा डोस घेण्यासाठीही गेला होता.
हे ही वाचा :
भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात
के एल राहुलकडे विकेटकीपिंगची धुरा, सराव सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर