Sourav Ganguly च्या जागी ‘हा’ क्रिकेटर होऊ शकतो BCCI अध्यक्ष
अमित शाह यांचे सुपूत्र जय शाह हे नव्या कार्यकारिणीत कुठल्या रोलमध्ये असणार?
मुंबई: BCCI च्या कार्यकारिणीसाठी येत्या 18 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. नव्या कार्यकारिणीमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होऊ शकतात. सध्या सौरव गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआय अध्यक्ष आहे, तर जय शाह (Jay shah) सचिव आहेत. सौरव गांगुली दुसऱ्यांदा बीसीसीआयच अध्यक्षपद भूषवण्याची शक्यता कमी आहे. विविध रिपोर्ट्सनुसार सौरव गांगुली पुन्हा बीसीसीआय अध्यपदाची निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे.
मग त्यांच्याजागी कोण?
सौरव गांगुली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते. सौरव गांगुली पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष होणार नसतील, मग त्यांच्याजागी कोण? हा प्रश्न आहे.
बैठकीला कोण-कोण उपस्थित होतं?
गुरुवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये गांगुली निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय झाला आहे. दैनिक जागरणने हे वृत्त दिलं आहे. सौरव गांगुली, जय शाह या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे.
उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरुण धुमल आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन या बैठकीला हजर होते. जय शाह पुन्हा एकदा बीसीसीआयच्या सचिवपदाची निवडणूक लढवू शकतात, असा वृत्तात दावा करण्यात आला आहे.
रॉजर बिन्नी यांचं नाव येणं आश्चर्यकारक
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी राज्य क्रिकेट संघटनांनी त्यांच्या प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्याजागी रॉजर बिन्नी यांचं नाव दिलं आहे. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य आहेत. बीसीसीआयमध्ये ते सौरव गांगुली यांची जागा घेऊ शकतात अशी चर्चा आहे.