Virat Kohli च्या खराब फॉर्मवर गांगुलीच महत्त्वपूर्ण विधान, Asia Cup बद्दल काय म्हणाला? ते जाणून घ्या
विराट कोहली मागच्या बऱ्याच काळापासून खराब फॉर्मचा सामना करतोय. इंग्लंड दौऱ्यावरही तो धावांचा दुष्काळ संपवू शकला नाही. त्यामुळे संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय.
मुंबई: विराट कोहली मागच्या बऱ्याच काळापासून खराब फॉर्मचा सामना करतोय. इंग्लंड दौऱ्यावरही तो धावांचा दुष्काळ संपवू शकला नाही. त्यामुळे संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आराम देण्यात आला. कोहलीने इंग्लंड विरुद्ध दोन वनडे सामन्यात फक्त 33 धावा केल्या. कसोटी मध्ये दोन्ही डावात 31 धावा केल्या. त्याचा हाच फॉर्म टी 20 मध्येही कायम राहिला. त्याने 2 टी 20 सामन्यात एकूण 12 धावा केल्या.
सौरव गांगुलीची अपेक्षा
आता टीम इंडिया आशिया कपची तयारी करत आहे. या स्पर्धेद्वारे 33 वर्षीय कोहली मैदानावर पुनरागमन करणार आहे. आशिया कप स्पर्धेआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोहलीच्या फॉर्मवरुन एक महत्त्वपूर्ण विधान केलय. आशिया कप मध्ये विराट कोहलीला त्याचा हरवलेला सूर सापडेल, अशी अपेक्षा सौरव गांगुलीने व्यक्त केली आहे. “त्याला सराव करुं दे. त्याला सामना खेळूं दे. तो मोठा खेळाडू आहे. त्याने भरपूर धावा केल्या आहेत. मला अपेक्षा आहे, तो चांगलं पुनरागमन करेल. तो फक्त शतक झळकवू शकत नाहीय. आशिया कप मध्ये त्याला त्याचा फॉर्म परत मिळेल” असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. स्पोर्ट्स तकने हे वृत्त दिलय.
भारतीय संघात बरेच बदल
कोहलीची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. 2019 साली इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात कोहलीने त्याचं शेवटच शतक झळकावलं होतं. त्यानंतर कोहलीने अर्धशतक झळकावली. पण चाहत्यांना त्याच्याकडून शतकाची अपेक्षा आहे. आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कोहलीवर सर्वांची नजर असेल. दुबई मध्ये आशिया कप स्पर्धा होणार आहे. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप नंतर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. मागच्यावर्षी पाकिस्तानने कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघावर मात केली होती. त्यानंतर भारतीय संघात बरेच बदल झाले आहेत. रवी शास्त्री आता कोच नाहीत. त्यांची जागा राहुल द्रविड यांनी घेतली आहे. कर्णधारही बदलला असून रोहित शर्मा आता कॅप्टन आहे.