IND vs SA: ‘मी कारण देणार…’, पराभवानंतर Rohit Sharma काय म्हणाला?
IND vs SA: पराभवाबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला....
पर्थ: टीम इंडियाचा आज टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला. टुर्नामेंटमधला टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. आज दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पाच विकेट राखून विजय मिळवला. दोन्ही टीमसाठी हा सामना महत्त्वाचा होता. कारण त्यामुळे सेमीफायनलचे दरवाजे उघडणार होते. दक्षिण आफ्रिकेची टीम आता ग्रुपमध्ये 5 पॉइंटसह टॉपवर आहे. त्याचवेळी टीम इंडिया 4 पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे.
सहजासहजी जिंकू दिलं नाही
दक्षिण आफ्रिकेने आजचा सामना जिंकला. पण भारताने त्यांना सहजासहजी जिंकू दिलं नाही. शेवटपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या टीमला झुंजवलं. अखेर शेवटचे 2 चेंडू बाकी असताना दक्षिण आफ्रिकेने विजय साकारला. एडन मार्कराम (52) आणि डेविड मिलर नाबाद (59) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
रोहित शर्मा काय म्हणाला?
“वातावरण बघता खेळपट्टीमध्ये काहीतरी असणार अशी आम्हाला अपेक्षा होती. वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, 130 धावांचा पाठलाग करणं सोपं नव्हतं. आम्ही चांगले खेळलो. पण आमच्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेने सरस खेळ केला” असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहितने प्रामाणिकपणे एक गोष्ट केली मान्य
“खेळपट्टी अशी होती की, वेगवान गोलंदाजांना विकेट मिळत होत्या. मिलर आणि मार्कराममध्ये मॅचविनिंग पार्टनरशिप झाली. पण आम्ही मैदानात तेवढे चांगले खेळलो नाही. आम्ही अशा कंडीशन्समध्ये खेळलो आहोत. त्यामुळे कंडीशन्सच कारण देणार नाही. आम्हाला कामगिरीत सातत्य ठेवणं गरजेच आहे. आम्ही आम्हाला मिळालेल्या संधीचा लाभ उठवू शकलो नाही. आम्ही काही रनआऊट सोडले, मी सुद्धा त्यात होतो” असं प्रामाणिकपणे रोहितने मान्य केलं.