Asia cup 2022: फक्त एका विजयाने पाकिस्तानला घमेंड चढली, माजी कॅप्टन म्हणतो….
Asia cup 2022: भारताने आशिया कप 2022 स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले. त्यानंतर सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाला.
मुंबई: भारताने आशिया कप 2022 स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले. त्यानंतर सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाला. भारतावर विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटुंनी भारताला डिवचणारी वक्तव्य सुरु केली आहेत. भारतीय संघाला पुढच्या सामन्यांमध्ये सुद्धा अडचणींचा सामना करावा लागेल, असा पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीजचा दावा आहे. “श्रीलंकेचा संघ भारतावर विजय मिळवू शकतो. कारण पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर रोहित एंड कंपनीवर दबाव आहे” असं हफीज पाकिस्तानी चॅनलवर म्हणाला.
मोहम्मद हफीजकडून टीम इंडियाला कमी लेखण्याची चूक
“भारत-पाकिस्तान सामन्याचा एक मानसिक परिणाम होतो. त्यातून बाहेर येणं कठीण आहे. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी संघाला अनेक सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. टीम इंडियासोबतही असच झालय. 2021 टी 20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानकडून भारत पराभूत झाला. त्यानंतर टीम इंडियाचा न्यूझीलंडकडूनही पराभव झाला होता. आता सुद्धा असं घडू शकतं” असं मोहम्मद हफीज पीटीवी स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला.
टार्गेट चेस केलं, तर ते जिंकू शकतात
“श्रीलंकेकडे हा सामना जिंकण्याची एक चांगली संधी आहे. टीम इंडियाची विजयाची दावेदार आहे, यात अजिबात शंका नाही. पण म्हणून तुम्ही श्रीलंकेकडे दुर्लक्ष करु शकत नाही. श्रीलंकेने मागच्या दोन सामन्यात चांगला खेळ दाखवलाय. त्यांनी टॉस जिंकला, टार्गेट चेस केलं, तर ते जिंकू शकतात” असं मोहम्मद हफीज म्हणाला.
टीम इंडियासाठी विजय आवश्यक
सुपर 4 राऊंड मध्ये भारताचा श्रीलंकेविरुद्ध सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकल्यानंतरच फायनल पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग थोडा सोपा होईल. श्रीलंकेने सुपर 4 च्या मागच्या सामन्यात अफगाणिस्तानला हरवलं होतं. राशिद खान विरोधात श्रीलंकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली होती. टीम इंडियासाठी हा चिंतेचा विषय आहे.