SL vs BAN Asia cup 2022: रोमांचक सामना, आशिया कप मधून मोठा संघ बाहेर
SL vs BAN Asia cup 2022: मॅच आधी खेळाडू, कोच आणि माजी खेळाडूंमध्ये शाब्दीक लढाई रंगली होती. त्याचे पडसाद मैदानात उमटताना दिसून आले. दोन्ही टीमचे खेळाडू त्वेषाने मॅच जिंकण्यासाठी खेळले.
मुंबई: श्रीलंकेने अखेर आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेच्या दुसऱ्याफेरीत प्रवेश केला आहे. ‘करो या मरो’ सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर (SL vs BAN) 2 विकेट राखून विजय मिळवला. श्रीलंकेच्या टीमने आता सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत पारडं कोणाच्या बाजूने झुकणार? याचा अंदाज येत नव्हता. श्रीलंकेचा संघ धावा करत होता. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला विकेटही पडत होते. एका नोबॉल चेंडूमुळे विजयी धाव श्रीलंकेच्या (Srilanka) खात्यात जमा झाली. श्रीलंका-बांगलादेश मॅच आधी खेळाडू, कोच आणि माजी खेळाडूंमध्ये शाब्दीक लढाई रंगली होती. त्याचे पडसाद मैदानात उमटताना दिसून आले. दोन्ही टीमचे खेळाडू त्वेषाने मॅच जिंकण्यासाठी खेळले. दोन्ही संघांनी काही चूका केल्या आणि चांगला खेळही दाखवला.
यशस्वी रन चेसचा रेकॉर्ड
श्रीलंका-बांगलादेश संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंका दोन्ही संघांना अफगाणिस्तानने पराभूत केलं होतं. त्यामुळे सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना जिंकणं, दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं होतं. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशकडून मधलीफळी आणि तळाच्या फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं. त्यांनी 20 षटकात 7 विकेट गमावून 183 धावा केल्या. श्रीलंकेने हे लक्ष्य पार करुन आशिया कप टी 20 मध्ये सर्वात यशस्वी रन चेसचा रेकॉर्ड बनवला.
मधल्या फळीचा दमदार खेळ
बांगलादेशने तिसऱ्या ओव्हर मध्ये आपला पहिला विकेट गमावला. पण कॅप्टन शाकिब अल हसनने ओपनर मेहजी हसन मिराजच्या साथीने 39 धावांची भागीदारी केली. सलग दोन षटकात मिराज आणि मुशफिकुर आऊट झाले. 11 व्या षटकात 87 धावांवर शाकिबही आऊट झाला. त्यानंतर अफीक हुसैनने 22 चेंडूत 39 धावा. मेहमुदुल्लाह 27 रन्स आणि मोसद्दक हुसैनच्या फलंदाजीच्या बळावर धावसंख्या 183 पर्यंत पोहोचवली.
शनाकाची कॅप्टन इनिंग
श्रीलंकेसाठी पाथुम निसंका आणि कुसल मेंडिसने चांगली सुरुवात केली. सहा ओव्हर्स मध्ये 45 धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात श्रीलंकेची स्थिती 4 बाद 77 होती. श्रीलंकेकडून कॅप्टन शनाकाने 33 चेंडूत 45 धावा आणि मेंडिसने 37 चेंडूत 60 धावा दमदार फलंदाजी केली. मेंडिसला या दरम्यान चारवेळा जीवदान मिळालं.
12 चेंडूत विजयासाठी हव्या होत्या 25 धावा
शेवटच्या 12 चेंडूत श्रीलंकेला विजयासाठी 25 धावांची गरज होती. चमिका करुणारत्ने या दरम्यान रनआऊटही झाला. पण असिता फर्नांडोने 3 चेंडूत नाबाद 10 धावा फटकावून संघाचा विजय पक्का केला. त्याने दोन चौकार लगावले. शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर श्रीलंकेने दोन धावा करुन स्कोरची बरोबरी केली. पण ओव्हरस्टेपमुळे पंचांनी तो चेंडू नोबॉल ठरवला. त्यामुळे श्रीलंकेला अतिरिक्त विजयी धाव मिळाली. अशा प्रकारे त्यांनी सुपर फोर मध्ये प्रवेश केला.