T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मॅच विनर कोण असेल? सुनील गावस्करांनी दिलं उत्तर
टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये कोण असेल? या प्रश्नाच उत्तर सोमवारी मिळालं. BCCI ने वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय टीम जाहीर केली.
मुंबई: टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये कोण असेल? या प्रश्नाच उत्तर सोमवारी मिळालं. BCCI ने वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय टीम जाहीर केली. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहे. प्रयोग करण्याची वेळ आता संपली आहे. सातत्यपूर्ण प्रदर्शन करणारे आणि मॅच विनर्सना टी 20 टीममध्ये स्थान मिळालं आहे.
सध्याची टीम वर्ल्ड कप जिंकू शकते
टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर या टीम निवडीवर समाधानी आहेत. सध्याची टीम वर्ल्ड कप जिंकू शकते, असं सुनील गावस्करांच मत आहे. सुनीला गावस्करांनी हार्दिक पंड्याच्या निवडीच विशेष कौतुक केलं. हार्दिक पंड्याची त्यांनी रवी शास्त्री बरोबर तुलना केली. वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्या विशेष प्रभावी ठरेल, असं सुनील गावस्करांच मत आहे.
पंड्या या वर्ल्ड कपमध्ये तसंच प्रदर्शन करेल
1985 साली ऑस्ट्रेलियात वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. त्यावेळी रवी शास्त्रीने दमदार कामगिरी केली होती. पंड्या या वर्ल्ड कपमध्ये तसंच प्रदर्शन करेल, असा विश्वास गावस्करांनी व्यक्त केला.
हार्दिक पंड्यामध्ये ‘ती’ क्षमता आहे
“1985 साली रवी शास्त्रीने जे केलं, ते या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्या करेल, असं मला वाटतं. संपूर्ण स्पर्धेत बॅट आणि बॉलने रवीने उत्तम कामगिरी केली होती. काही चांगले झेलही पकडले होते. हार्दिक पंड्यामध्ये असं प्रदर्शन करण्याची क्षमता आहे” असं गावस्कर इंडिया टुडेवर बोलताना म्हणाले.
वर्ल्ड चॅम्पियनशिपचा किताब जिंकला
1985 साली रवी शास्त्रीने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला होता. त्यासाठी ते मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले होते. त्यांनी पाच मॅचमध्ये 182 धावा करताना तीन अर्धशतकं झळकावली होती. आठ विकेट काढले होते. पाकिस्तान विरुद्ध फायनलमध्ये 63 धावा करुन एक विकेट काढली होती. गावस्करांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियनशिपचा किताब जिंकला होता.
आपल्याला त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे
“हार्दिक पंड्या काही महिन्यांपूर्वी पाठिच्या दुखण्यातून सावरला आहे. तो आपला मॅचविनर ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीने नाही, तर हार्दिक पंड्या फिल्डिंगमध्येही भारताच्या बाजूने सामना फिरवू शकतो. 1985 साली रवी शास्त्रीने जी कामगिरी केली, तसंच प्रदर्शन त्याने करुन दाखवल्यास मला आश्चचर्य वाटणार नाही” असं सुनील गावस्कर म्हणाले.