IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराटसाठी आनंदाची बातमी, संघात दोन धुरंदर फलंदाजांचे होणार आगमन
बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी दोन नव्या खेळाडूंना संघात सामिल करुन घेण्याची घोषणा केली होती. या दोन्ही खेळाडूंची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आल्याने लवकरच ते संघात सामिल होणार आहे.
मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात सामिल होण्यासाठी फलंदाज सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पूर्णपणे फिट झाले आहेत. दोघेही श्रीलंका दौऱ्यावर असताना त्याठिकाणी संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोघांच्या इंग्लंडला जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र आता दोन्ही खेळाडूंच्या तीन कोविड-19 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे पुढील 24 तासांत दोघेही इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने शॉ आणि यादवला इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.
श्रीलंका दौऱ्यावर गेले असताना सामन्यानंतर त्वरीतच पृथ्वी आणि सूर्यकुमार हे इंग्लंडला रवाना होणार होते. पण श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्याआधी भारताचा ऑलराउंडर कृणाल पंड्या कोरोना पॉजिटिव्ह आढळला. ज्यामुळे इतर खेळाडूंचीही कोरोना चाचणी करण्यात आली. तर पृथ्वी आणि सूर्यासह आणखी काही खेळाडू कृणालच्या निकट संपर्कात आल्याने त्यांची अधिक काळजी घेण्यात आली होती. पण सूर्या आणि पृथ्वी दोघांनाही कोरोनाची कोणतीच लक्षणं नसल्याने ते इंग्लंडला रवाना होणार आहेत.
टीम इंडियासाठी खुशखबर
शॉ आणि यादव यांना इंग्लंडसाठी रवाना करण्याकरता बीसीसीआयककडून सर्व आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे. हे दोघेही संघात सामिल होण्याने विराटला संघ निवडताना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. श्रीलंकेत भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर इंग्लंड सरकार दोन्ही खेळाडूंना मालिकेसाठी सामिल करुन घेण्याकरता विरोध करतील अशा बातम्या समोर येत होत्या. डेक्कन क्रॉनिकलला एका सूत्राने दिलेल्या माहितीत, “दोघेही आपला व्हीजा येण्याची वाट पाहत आहेत. पण शनिवार आणि रविवारी सुटी असल्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत असून पुढील 24 तासांत दोघेही इंग्लंडला रवाना होऊ शकतात.”
विलगीकरण आवश्यक
भारतीय क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड क्रिकेट यांच्यातील चर्चेनंतर शॉ आणि यादव यांना इंग्लंडला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण कोरोना नियमांमुळे दोघांनाही विलगीकरणाचा कालावधी मात्र पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी तरी ते मैदानात उतरणार नसून त्यानंतर संघात स्थान दिल्यास ते खेळू शकतील.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
हे ही वाचा
IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन
IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय
(Suryakumar yadav and prithvi shaw Corona test negative set to join team india For england test series)