Suryakumar Yadav: ….तर, आज सूर्यकुमार दिसला नसता, News9 Live च्या मुलाखतीत धक्कादायक माहिती उघड
Suryakumar Yadav: सहा वर्षांपूर्वी सूर्यकुमार यादवच्या आयुष्यात काय घडलेलं?
किरण डी तारे, मुंबई : क्रिकेट जगतात आज सूर्यकुमार यादवचा बोलबाला आहे. सर्वत्र सूर्याचीच चर्चा आहे. क्रिकेट विश्वात टी 20 फॉर्मेटमधला तो आज नंबर एक फलंदाज आहे. पण 6 वर्षांपूर्वी हाच सूर्या क्रिकेट सोडण्याच्या मनस्थितीत होता. मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईच्या टीममध्ये त्याची निवड झाली नव्हती. त्यामुळे सूर्या क्रिकेटला रामराम करण्याच्या विचारात होता.
मुंबई ऐवजी दुसऱ्या कुठल्या राज्याच्या टीमकडून खेळायचं का? हा विचार त्याच्या डोक्यात होता. पण अखेरीस त्याचं समर्पण, संयम आणि मेहनतीमुळे त्याने टीम इंडियात स्थान मिळवलं.
खोदादाद यजदेगर्दीनी सूर्याबद्दल काय सांगितलं?
सूर्यकुमारच्या आयुष्यातील या पॅचबद्दल फार कमी जणाना माहितीय. पारसी जिमखानाचे उपाध्यक्ष खोदादाद यजदेगर्दी यांनी सूर्याच्या आयुष्यातील बॅड पॅचबद्दल सांगितलं. ते News9 Live शी बोलत होते. सूर्या मुंबईत असताना पारसी जिमखान्यावर प्रॅक्टिस करतो. सूर्याने रविवारी न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 111 धावांची खेळी केली. तो टी 20 क्रिकेटमध्ये नंबर 1 स्थान टिकवून आहे.
दुसऱ्या राज्याने त्याचा आनंदाने स्वीकार केला असता
“2016-17 साली मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्यावेळी सूर्यकुमारला मुंबईच्या टीममधून वगळण्यात आलं. त्यावेळी तो निराश होता. ते असे दिवस होते, ज्यावेळी सूर्यकुमारच्या डोक्यात क्रिकेट सोडण्याचा किंवा दुसऱ्या टीमकडून खेळण्याचा विचार होता” असं खोदादाद यजदेगर्दी यांनी सांगितलं. “कुठल्याही दुसऱ्या राज्याने त्याचा आनंदाने स्वीकार केला असता, पण त्यावेळी मी त्याला सांगत होतो की, तू मुंबईसाठी योग्य खेळाडू आहेस, तू याच टीमकडून खेळ” असं यजदेगर्दी म्हणाले.
मॅच कुठलीही असो, पण त्याच्यासाठी….
“सूर्या जेव्हा कधी मैदानात पाऊल टाकायचा, तेव्हा तो तितकाच गांभीर्याने खेळायचा. मग भले ती प्रॅक्टिस असो, मैत्रीपूर्ण सामना किंवा मुंबईची कुठली टुर्नामेंट. आपल्याकडून 200 टक्के सर्वोत्तम खेळण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. प्रत्येक मॅच नंतर स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा त्याला ध्यास असायचा” असं यजदेगर्दी म्हणाले. ते सूर्याला दोन दशकापासून ओळखतात.
कसोटीमध्ये 5 हजार धावांचा पल्ला शक्य
“सूर्यकुमार यादव शिकण्यामध्ये हुशार आहे. वेगाने गोष्टी तो आत्मसात करतो. क्रिकेटबद्दल त्याच्याकडे मोठा विचार आहे. तो प्रत्येक मॅच चांगल्या पद्धतीने समजून घेतो. भारताकडून त्याने कसोटी क्रिकेट खेळावं, असं रवी शास्त्री म्हणाले. त्याच्यामध्ये अजून सहा ते आठ वर्षाच क्रिकेट शिल्लक आहे. कसोटीमध्ये तो 5००० धावांचा पल्ला गाठू शकतो” असं यजदेगर्दी म्हणाले.