मोहाली : मुंबई इंडियन्सने काल पंजाब किंग्सचा बदला घेतला. होम पीचवर झालेल्या पराभवाचं मुंबई इंडियन्सने काल उट्टं काढलं. मुंबईने पंजाबला सहा गडी राखून पराभूत करून आम्हीही काही कमी नाही हेच दाखवून दिलं. खरंतर कालचा सामना टफ होता. पंजाबने मुंबईसमोर 215 धावांचा डोंगर रचला होता. हे आव्हान पेलणं मुंबईसाठी मुश्कील होतं. आयपीएलच्या सध्याच्या मोसमात एवढ्या मोठ्या धावांचा कुणीच पाठलाग केला नव्हता. मात्र, मुंबईने धावांचा हा डोंगर पोखरून काढला. इशान किशनच्या वादळी फलंदाजीमुळेच हे शक्य झालं.
इशान किशनने या सामन्यात सीजनमधील दुसरं अर्धशतक ठोकलं. याच सामन्यात इशान किशनने सीजनमधील सर्वोच्च स्कोअरही केला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात इशान पूर्वीसारखाच आपल्या लयीत खेळताना दिसला. त्याने कालच्या सामन्यात 41 चेंडूत सात चौकारांच्या सहाय्याने चार षटकार लगावत 71 धावा कुटल्या. त्याच्या या वादळी खेळीमुळे मुंबईचा विजय सोपा झाला.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबने 20 ओव्हरमध्ये तीन विकेट गमावत 214 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात हवी होती. सामान सुरु झाल्यावर पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्याच चेंडूवर मुंबईने रोहित शर्माची विकेट गमावली. ऋषी धवनच्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टने त्याचा झेल पकडला. रोहित खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर इशानने कॅमरन ग्रीनसोबत मिळून टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 54 धावांची भागीदारी केली. मात्र, ग्रीन अधिक काळ इशानला साथ देऊ शकला नाही. तो 18 चेंडूवर चार चौकार ठोकून 23 धावांवर बाद झाला.
एव्हाना मुंबईने दोन बळी गमावले होते. तरीही इशान डगमगला नाही. त्याची बॅट तळपतच होती. त्याला सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. या दोघांनी शतकी भागिदारी करत मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. इशान मैदानात तुफान फटकेबाजी करत होता. पूर्वीसारखीच त्याने स्फोटक फलंदाजी केली.
अर्शदीपने 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये इशानने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. यापूर्वी त्याने ऋषी धवन आणि सॅम करनला निशाणा बनवलं होतं. सूर्यकुमारच्या साथाने इशानने 116 धावांची भागिदारी केली. अर्शदीपने 17व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर इशान धवनचा बळी घेतला. इशान झेलबाद झाला. ऋषी धवनने त्याची कॅच पकडली. परंतु तोपर्यंत इशानने आपला खेळ पूर्ण केलेला होता. मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते.
आयपीएलमध्ये मुंबईने आतापर्यंत आपला प्रभाव दाखवला नव्हता. प्ले ऑफमध्ये राहण्यासाठी मुंबईला प्रत्येक सामना जिंकणं आवश्यक होतं. त्यामुळे कालचा सामनाही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र, काल सामन्याची खराब सुरुवात झाल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पण इशानने मैदानात पाय रोवले आणि मुंबईला प्रचंड मोठा विजय मिळवून दिला.