Mumbai Indians IPL 2022: Suryakumar yadav च्या बॅटिंगमधली कमकुवत बाजू कळली, कामचलाऊ गोलंदाज संपवतात खेळ
Mumbai Indians IPL 2022: काल लखनौ विरुद्धच्या सामन्यात बदोनी त्याला गोलंदाजी करत होता. तेव्हा दुसऱ्या चेंडूवर त्याने लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला.
मुंबई: IPL 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अपयशी ठरला. तो सात चेंडूत फक्त सात रन्स करुन आऊट झाला. सूर्यकुमार लवकर आऊट झाल्यामुळे पुन्हा एकदा विजयाची संधी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) हातून निसटली. सध्याच्या मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सूर्यकुमार यादवच्या कामगिरीत सातत्य आहे. तोच सातत्याने धावा करतोय. सूर्या या सीजनमध्ये पहिल्यांदाच दोन आकडी धाव करण्यापूर्वी आऊट झाला. लखनौचा पार्ट टाइम गोलंदाज आयुष बदोनीमुळे (Aayush Badoni) हे सर्व झालं. लखनौच्या या युवा खेळाडूने एक षटक टाकलं आणि थेट सूर्यकुमारचा विकेट घेतला. सूर्यकुमार यादव अनेकदा पार्ट टाइम गोलंदाजाचीच शिकार ठरला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत चार वेळा सूर्यकुमारची विकेट ऑफ स्पिनर्सनी घेतली आहे. मर्लोन सॅम्युअल्स, हरभजन सिंग, गुरकीरत सिंह मान आणि आयुष बदोनीने सूर्याला बाद केलं आहे.
पार्ट टाइम गोलंदाजांसमोर बेफिकीरी
विशेष म्हणजे हरभजन वगळता अन्य तिघे पार्ट टाइम गोलंदाज आहेत. सूर्यकुमार यादव फिरकी गोलंदाजांना तसा चांगला खेळतो. पण पार्ट टाइम गोलंदाजांसमोर कदाचित बेफिकीरीमुळे त्याची विकेट जात असावी. काल लखनौ विरुद्धच्या सामन्यात बदोनी त्याला गोलंदाजी करत होता. तेव्हा दुसऱ्या चेंडूवर त्याने लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला. पण असं झालं नाही. चेंडू बॅटच्या वरच्या बाजूची कड घेऊन एक्स्ट्रा कवरमध्ये गेला. तिथे केएल राहुलने त्याचा झेल घेतला. सूर्यकुमार सात चेंडूत एका चौकारासह सात धावा करुन आऊट झाला. मुंबई इंडियन्सकडून बाद होणारा तो चौथा फलंदाज होता.
या सीजनमध्ये सूर्याने आतापर्यंत किती धावा केल्यात?
सूर्याचं बाद होणं, मुंबईसाठी एक मोठा झटका होता. कारण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्याआधी त्याने 32,37,43 नाबाद 68 आणि 52 अशी शानदार फलंदाजी केली आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यात दुखापतीमुळे तो खेळू शकलेला नाही. आयपीएल 2022 च्या सहा सामन्यात त्याने 47.80 च्या सरासरीने 151.26 च्या स्ट्राइक रेटने 239 धावा केल्या आहेत. मुंबईचा या सीजनमधला तो सर्वात यशस्वी फलंदाज आहे.