अनंत-राधिकाच्या संगीत सेरमनीमध्ये देखील टी-20 विजयाचे सेलिब्रेशन, खेळाडूंचा डान्स Video
राधिका आणि अनंत अंबानी यांच्या संगीत सेरमनीमध्ये देखील टी२० वर्ल्डकप विजयाचंच सेलिब्रेशन पाहायला मिळालं. अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या पोहोचले होते. स्टेजवर सर्व खेळाडूंचे स्वागक करण्यात आले.
टीम इंडियावर सगळीकडूनच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टीम इंडिया विजयी होऊन भारतात परतल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंचा विविध ठिकाणी सत्कार होत आहे. आता अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात देखील टीम इंडियाच्या विजयाचीच चर्चा झाली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव यांना स्टेजवर आमंत्रित करण्यात आले. तेव्हा अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात अरिजित सिंग आणि प्रीतमचे गाणे वाजू लागले. अंबानी कुटुंबाने तिन्ही खेळाडूंचे स्वागत केले. हे तिन्ही खेळाडू अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स संघाचे देखील भाग आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी आपल्या सर्व स्टार्सला मिठी मारून अभिनंदन करताना दिसत आहे आणि आकाश अंबानी देखील मंचावर उपस्थित आहे. मुंबई इंडियन्सचे मालक असलेले अंबानी कुटुंबानी त्यांच्यासाठी मोठा उत्साह दाखवला. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत लहारो दो गाण्यावर नाचताना दिसले.
या कार्यक्रमाला भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी देखील पोहोचला होता. यासोबतच मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक इशान किशन यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. झहीर खान देखील पत्नी सगिरका घाटगेसोबत पोहोचला होता.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टी२० वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर प्रत्येक भारतीय अभिमानाने भावूक झाला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत होता. बार्बाडोसहून मायदेशी पोहोचल्यापासून टीम इंडिया जल्लोषात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत विजेत्यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत भारतीय संघाची विजयी परेड काढण्यात आली होती.
Nita Ambani and Akash Ambani honoring Hardik Pandya, Surya Kumar Yadav, and Rohit Sharma for their victory in the T20 World Cup! 🏆🎉#NitaAmbani #AkashAmbani #HardikPandya #SuryaKumarYadav #RohitSharma #T20WorldCup #RadhikaMerchant #Anantambani pic.twitter.com/rJ6hQJMt1U
— Media Buzz India (@media_buzz_in) July 6, 2024
भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईत लाखोंचा जनसागर उसळला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारतीय संघाचा सत्कार करण्यात आला. भारतीय संघातील महाराष्ट्रातील खेळाडूंचे महाराष्ट्राच्या विधानभवनाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.