T20 WC : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं, शोएब मलिककडून सगळं श्रेय टीम इंडियाला
टीम इंडियाला पराभूत करून टी-20 वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात करणारा पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या मार्गावर उभा राहिला. संघाने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत.
![T20 WC : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं, शोएब मलिककडून सगळं श्रेय टीम इंडियाला T20 WC : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं, शोएब मलिककडून सगळं श्रेय टीम इंडियाला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/11/02173420/shoaib-malik-1.jpg?w=1280)
मुंबई : टीम इंडियाला पराभूत करून टी-20 वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात करणारा पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या मार्गावर उभा राहिला. संघाने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत. संघाचा वरिष्ठ फलंदाज शोएब मलिक याने सोमवारी संघाच्या फॉर्मचे श्रेय टीम इंडियाला दिले. पहिल्याच सामन्यात भारतावर दणदणीत विजय मिळवून टी-20 विश्वचषकात आपल्या संघाला चांगल्या कामगिरीची लय मिळाली असल्याचे त्याने सांगितले. (T20 WC: Pakistan semifinal ticket confirmed, all credit goes to Team India says Shoaib Malik)
पाकिस्तानने पहिला सामना भारतावर दहा गडी राखून जिंकला होता. यानंतर या संघाने ग्रुपमधील आणखी एक बलाढ्य संघ न्यूझीलंडला पाच गडी राखून पराभूत केले. स्पर्धेतील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान अफगाणिस्तानशी भिडला आणि येथेही पाकिस्तानने पाच विकेट्सने विजय मिळवला. आता मंगळवारी नामिबियाशी सामना होईल. या सामन्यातील विजय त्यांना उपांत्य फेरीत घेऊन जाईल.
टीम इंडियावरचा विजय फायद्याचा ठरला
शोएब मलिकने नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले की, भारताला हरवून मोठा फायदा झाला. “खरे सांगायचे तर, जेव्हा स्पर्धेची सुरुवात मोठ्या संघाविरुद्ध होते आणि तुम्ही तो सामना जिंकता तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये सर्वकाही व्यवस्थित होते,” मलिक पत्रकार परिषदेत बोलत होता.
मलिक म्हणाला, ‘आम्हालाही लय मिळाली. पहिल्या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून लय मिळवण्याच्या इराद्याने प्रत्येक संघ येतो.” गेल्या 15 वर्षांत पाकिस्तानसाठी 119 टी-20 खेळलेल्या मलिकने सांगितले की, खेळाडूंनी ज्या पद्धतीने दबावाचा सामना केला ते कौतुकास्पद आहे. पाकिस्तानचा संघ अशी चांगली कामगिरी करताना पाहणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. प्रत्येकजण एकमेकांना मदत करत आहे. हा सांघिक खेळ आहे आणि या मदतीची गरज आहे.
भारताचा दारुण पराभव
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 24 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेची मोहिम सुरु केली होती. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधला बहुचर्चित सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पार पडला. भारतीय संघाची खराब फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीमुळे सामना भारताने गमावला. अत्यंत खराब सुरुवात झाल्यानंतर भारताने केवळ 151 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या. यामध्ये कर्णधार कोहलीने एकहाती झुंज देत 49 चेंडूत 57 तर पंतने 39 धावा केल्या. यावेळी पाकिस्तानच्या शाहीनने सर्व महत्त्वाचे बळी घेतले. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार आणि विराट यांचा समावेश आहे. पाकिस्तानसमोर असलेल्या 152 धावांच टार्गेट त्यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी अर्धशतकं ठोकत सामना जिंकला.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: 5 प्रकारचे चेंडू फेकणाऱ्याला संघाबाहेर कसं केलं?, दिग्गज फिरकीपटूचा सवाल
(T20 WC: Pakistan semifinal ticket confirmed, all credit goes to Team India says Shoaib Malik)