T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे निराश झालेल्या चाहत्यांना गौतम गंभीरचं आवाहन, म्हणाला…
आयसीसी टी-20 विश्वचषक-2021 स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करताच टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. त्यामुळे भारताची मोहीम सुपर-12 च्या पुढे जाऊ शकणार नाही.
मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषक-2021 स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करताच टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. त्यामुळे भारताची मोहीम सुपर-12 च्या पुढे जाऊ शकणार नाही. सध्या भारताला शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करायचा आहे. टीम इंडियाच्या या कामगिरीने सर्वजण निराश झाले आहेत. संघातील खेळाडू, चाहते तसेच क्रिकेट पंडितदेखील भारताच्या कामगिरीवर नाराज आहेत. भारत बाद फेरीतही पोहोचणार नाही, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. सुरुवातीपासूनच विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने मात्र भारतीय क्रिकेट चाहत्यांना आवाहन केलं आहे की, “त्यांनी संघाला पाठिंबा देणे थांबवू नये.” (T20 World Cup 2021: I urge fans to continue Support and to be proud of Indian team, says Gautam Gambhir)
गंभीरने चाहत्यांना संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे, पण टीम इंडियातील त्रुटी आणि विजेत्या संघाच्या मानसिकतेबद्दलही तो बोलला आहे. गंभीरने टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात लिहिले आहे की, “ही भावना कधीही चांगली असू शकत नाही. एक खेळाडू म्हणून, तुम्हाला तुमचं नशीब स्वतः लिहायचं असतं. तुम्ही कधीही इतर संघांच्या गणितावर, त्यांच्या जय-परायजावर अवलंबून राहू नये. मला नेमके काय म्हणायचे आहे ते भारतीय संघ तुम्हाला सांगेल. चॅम्पियन खेळाडू जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करतात. विरोधी संघापेक्षा एक धाव अधिक करण्यासाठी ते मेहनत घेतात. चॅम्पियन संघ न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहू शकत नाही. अशा प्रकारे सुपर 12 मधून बाहेर जाणे किंवा दक्षिण आफ्रिकेप्रमाणे नेट रन रेट कमी पडल्यामुळे स्पर्धेतून बाहेर जाणे खूप वाईट आहे.
किंतु-परंतुला जागा नाही
भारतीय संघाने काही छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चूक केली, ज्याचा फटका त्यांना सहन करावा लागला, असे गंभीरने म्हटले आहे. गंभीरने लिहिले आहे की, “जेव्हा तुम्ही मोठ्या विजयाची तयारी करता तेव्हा तुम्हाला छोट्या गोष्टींचा आदर करावा लागतो. पण या खेळात किंतु-परंतुला स्थान नाही, पण भारतीय संघाने शाहीन शाह आफ्रिदीसाठी चांगले नियोजन केले असते आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळपट्टीची चाचणी केली असती तर गोष्टी अधिक चांगल्या होऊ शकल्या असत्या. ही स्पर्धा दोन गटांऐवजी राऊंड रॉबिन पद्धतीने झाली असती तर स्पर्धेचं चित्र वेगळं असतं, हा एक संयोजकांसाठी धडा आहे का?
चाहत्यांनी साथ द्यावी
चाहत्यांना आवाहन करताना गंभीरने टीम इंडियाला पाठिंबा द्यावा आणि त्यांचा अभिमान बाळगावा, असे म्हटले आहे. त्याने लिहिले आहे की, “मी चाहत्यांना भारतीय संघाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन करू इच्छितो. केवळ या एका विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीवरुन तुम्ही त्यांना जज करत असाल तर टीमचे चाहते म्हणून आपण त्यांचा सन्मान करण्यात कमी पडतोय, अशा वागण्याने आपण त्यांच्याविरुद्ध आपली निष्ठा दाखवू शकणार नाही.”
इतर बातम्या
(T20 World Cup 2021: I urge fans to continue Support and to be proud of Indian team, says Gautam Gambhir)