T20 World Cup 2022: पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल, नामीबियाने श्रीलंकेला दिला मोठा झटका
T20 World Cup 2022: पण या सामन्यात प्रत्यक्ष या उलट घडलं. क्रिकेट जगतात कोणीही अपेक्षा केली नव्हती, असा धक्कादायक निकाल लागला
T20 World Cup 2022 चं आजपासून बिगुल वाजलं आहे. पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. आज श्रीलंका आणि नामीबियामध्ये (Srilanka vs Namibia) पहिली मॅच झाली. नामीबियाच्या तुलनेत श्रीलंका मजबूत संघ (SrilankaTeam) आहे. मॅच सुरु होण्याआधी सर्वांना श्रीलंका सहज विजय मिळवेल, असं वाटलं होतं. दुबळ्या नामीबियाच श्रीलंकेसमोर काही चालणार नाही, असाच सर्वांनी अंदाज बांधला होता.
श्रीलंका किती रन्सवर ऑलआऊट
पण सामन्यात प्रत्यक्ष या उलट घडलं. क्रिकेट जगतात कोणीही अपेक्षा केली नव्हती, असा धक्कादायक निकाल लागला. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नामीबियाने बलाढ्य श्रीलंकेवर 55 धावांनी विजय मिळवला. सर्वांनाच या निकालाने धक्का दिला आहे.नामीबियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 163 धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा डाव 19 ओव्हर्समध्ये 108 धावात आटोपला.
A historic win for Namibia ?#T20WorldCup | #SLvNAM | ? https://t.co/vuNGEcX62U pic.twitter.com/AvCsiz9X7K
— ICC (@ICC) October 16, 2022
40 धावात चार फलंदाज तंबूत
नामीबियाच्या 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची खूपच खराब सुरुवात झाली. कुशल मेंडीस (6) आणि पाथुम निसांका (9) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. 40 धावात श्रीलंकेचे चार फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर भानुका राजपक्षे (20) आणि कॅप्टन दासुन शनाका (29) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 74 धावांवर राजपक्षे आऊट झाला. त्यानंतर पुन्हा एकदा रांग लागली.
श्रीलंकेच्या फलंदाजांची सुमार कामगिरी
एकवेळ श्रीलंकेची टीम 100 च्या आत ऑलआऊट होते की, काय? असं वाटलं होतं. श्रीलंकेच्या फलंदाजांनी आज सुमार कामगिरी केली. या विजयाच श्रेय नामीबियाच्या गोलंदाजांना जातं. त्यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. डेविड, बर्नाड, बेन आणि जॅन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
नामीबियाकडून कोण खेळलं?
नामीबियाची सुरुवातही फार चांगली झाली नव्हती. 35 धावात त्यांच्या तीन विकेट गेल्या होत्या. नामीबियाकडून जॅन निकोल (20), स्टीफ्न बार्ड (26), जॅन फ्रायलिंक (44), जेजे स्मिथ नाबाद (31) यांच्या बळावर 163 धावांपर्यंत मजल मारली.
सुपर 12 राऊंड कधी सुरु होणार?
मागच्या महिन्यात श्रीलंकेने भारत, पाकिस्तान टीमला हरवून आशिया कप स्पर्धेच विजेतेपद पटकावलं होतं. आजपासून वर्ल्ड कपचा पहिला राऊंड सुरु झाला आहे. 8 टीम्सचा निर्णय पहिल्या राऊंडमध्ये होईल. 8 पैकी 4 टीम्स सुपर 12 मध्ये प्रवेश करतील. या फेरीनंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 राऊंड सुरु होईल.