T20 World Cup मधून दक्षिण आफ्रिकेचा मोठा खेळाडू बाहेर, तुफानी बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला संधी
T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेने यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या टीम मध्ये एका मोठ्या खेळाडूला स्थान मिळालेलं नाही.
मुंबई: दक्षिण आफ्रिकेने यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या टीम मध्ये एका मोठ्या खेळाडूला स्थान मिळालेलं नाही. 15 सदस्यीय टीम मधून दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज रासी वान डर दुसे बाहेर गेला आहे. दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याचा संघात समावेश केलेला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या स्टबचा वर्ल्ड कप टीम मध्ये समावेश करण्यात आला आहे. याचवर्षी भारत दौऱ्यात टी 20 सीरीज मध्ये स्टबने इंटरनॅशनल डेब्यु केला होता.
बावुमाच्या कोपराला दुखापत
टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या टीमचं नेतृत्व करणार आहे. भारत दौऱ्यावरुन परतल्यानंतर कोपराच्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. दुखापतीमुळेच बावुमा इंग्लंड दौऱ्यावर गेला नाही. आता तो भारत दौऱ्यात पुनरागमन करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. इथे त्यांना 3 टी 20 आणि तितकेच वनडे सामने खेळायचे आहेत.
इंग्लंड विरुद्ध रासी वान डर दुसेला दुखापत
रासी वान डर दुसे दक्षिण आफ्रिकेचा मोठा खेळाडू आहे. तो सध्या फॉर्म मध्ये होता. त्याचं संघाबाहेर जाणं, दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा झटका आहे. वर्ल्ड कप मध्ये दक्षिण आफ्रिकेला त्याची कमतरता जाणवेल. ओल्ड ट्रॅफर्ड मध्ये इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. तरीही त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्याडावात फलंदाजी केली होती. डॉक्टरांनी दुखापतीची तपासणी केल्यानंतर 6 आठवड्यापर्यंत मैदानाबाहेर राहण्याचा सल्ला दिला.
PROTEAS WORLD CUP SQUAD ??
1⃣5⃣ players ? World Cup debut for Tristan Stubbs ? Rassie van der Dussen misses out due to injury#BePartOfIt #T20WorldCup pic.twitter.com/0Pzxm4uDQJ
— Cricket South Africa (@OfficialCSA) September 6, 2022
स्टब डेब्युसाठी तयार
स्टब वर्ल्ड कप मध्ये डेब्यु करण्यासाठी तयार आहे. त्याने याचवर्षी जून महिन्यात दिल्ली मध्ये भारताविरोधात टी 20 इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये डेब्यु केला होता. स्टबने 6 टी 20 सामन्यात एकूण 119 धावा केल्या आहेत. यात 72 धावांची त्याची मोठी इनिंग आहे. इंग्लंड विरुद्ध ब्रिस्टल मध्ये तो ही इनिंग खेळला होता. स्टबचा स्ट्राइक रेट सध्या 216 च्या जवळपास आहे.
दक्षिण आफ्रिकेचं स्क्वॉड: टेंबा बावुमा, (कॅप्टन) क्विंटन डि कॉक, रीजा हेंडरिक्स, हेनरिक क्लासन, केशव महाराज, ऐडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी निगिडी, एनरिक नॉर्खिया, वायेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, राइली रुसौ, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब