Warm-Up Match: दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियाच काय चुकलं? का हरले? जाणून घ्या कारणं
Warm-Up Match: टीम इंडियाच्या या पराभवाने अनेक प्रश्न निर्माण झालेत.....
मुंबई: पर्थ (Perth) येथे दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये (Practice Match) टीम इंडियासाठी अपेक्षित निकाल लागला नाही. गोलंदाजी चालली पण फलंदाजांचा फ्लॉप शो पहायला मिळाला. टीम इंडियाचा (Team India) दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये 36 धावांनी पराभव झाला. फक्त फलंदाजांच अपयश हेच या सामन्यातील पराभवाच कारण नाहीय. काही चुकीचे निर्णयही कारणीभूत आहेत.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय टीम मैदानात उतरली, तेव्हा फलंदाजीत पहिला बदल दिसला. केएल राहुल आणि ऋषभ पंत सलामीला उतरले होते. हा नवीन प्रयोग यशस्वी ठरला नाही.
8 फलंदाजांच्या मिळून 48 धावा
फक्त सलामीची जोडीज नाही, त्यानंतर आलेले अन्य फलंदाजही अपयशी ठरले. ऋषभ पंत प्रमाणे दीपक हुड्डाही दोन आकडी धावसंख्या करु शकले नाहीत. हार्दिक पंड्याने चांगली सुरुवात करुन दिली. पण तो खेळपट्टीवर फारवेळ टिकला नाही. अक्षर पटेल मिळालेल्या संधीच सोनं करु शकला नाही.
मॅच फिनिशरच्या रोलमध्ये असणारा दिनेश कार्तिकही नेहमीच्या फॉर्ममध्ये दिसला नाही. लोअर ऑर्डरच्या फलंदाजांकडून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नव्हता. टीम इंडियाच्या 8 फलंदाजांनी मिळून स्कोरबोर्डवर फक्त 48 धावा लावल्या.
राहुलने वेगाने फलंदाजी केली असती, तर….
भारताकडून केएल राहुलने फक्त 55 चेंडूत 74 धावा केल्या. पण त्याने आपली इनिंगची सुरुवात धीम्यागतीने केली. त्यामुळे नंतर येणाऱ्या फलंदाजांवर एक प्रकारचा दबाव निर्माण झाला. टीम इंडियाच्या पराभवाचा तो फॅक्टर आहे.
कॅप्टन बदलला
कॅप्टन बदलणं हे सुद्धा टीम इंडियाच्या प्रॅक्टिस मॅचमधील पराभवाच एक कारण आहे. रोहित शर्माच्या जागी आज केएल राहुल कॅप्टन होता.
विराट-सूर्याशिवाय टीम इंडिया जिंकू शकत नाही?
या पराभवाने टीम इंडियासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेत. सूर्यकुमार यादव, विराट कोहली शिवाय टीम इंडिया जिंकू शकत नाही? हे दोन फलंदाज आजच्या मॅचमध्ये खेळत नव्हते. टीम इंडियाने पहिल्या सराव सामन्यात विजय मिळवला. त्याचं कारण सूर्यकुमार यादवच तुफानी अर्धशतक होतं.