भर मैदानात अफगाणिस्तानच्या खेळाडूचा चिडीचा डाव, सेमीफायनलासाठी तरसलेला पण संधी गमावणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणाला…
"आम्हाला टुर्नामेंटमध्ये खेळण्याची इच्छा होती. पण ते आमच्या हातात नव्हतं. अर्थात त्याला आम्हीच जबाबदार आहोत. बांगलादेशची शेवटची विकेट पडली तेव्हा आम्ही खूप निराश झालो. आम्ही टुर्नामेंटमध्ये पुढे कायम राहण्यासाठी खूप इच्छुक होतो", असं मिशेल मार्श म्हणाला.
टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या सुपर 8 सामन्यांमधील शेवटचा सामना काल खेळण्यात आला. अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात हा सामना पार पडला. या सामन्यात पाऊस पडल्यामुळे डकवर्थ-लुईस नियमाचा अवलंब करण्यात आला. या सामन्यादरम्यान एक विचित्र प्रकार बघायला मिळाला. या सामन्यात अफगाणिस्तानला विजय मिळाला तर त्यांची थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री होणार होती. त्यामुळे या सामन्यादरम्यान एक विचित्र प्रकार बघायला मिळाला. डकवर्थ-लुईस नियमानुसार अफगाणिस्तानचा संघ 2 धावांनी पुढे होता. त्याचवेळी पावसाचं वातावरण होतं. त्यामुळे पावसामुळे सामना थांबवण्यात आला तर त्या निमयानुसार आपल्या संघाला विजयी घोषित केलं जाऊ शकतं, या आमिषाने अफगाणिस्तानचा खेळाडू गुलबदिन नायब याने मैदानात दुखापत झाल्याचं नाटक करत वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. त्याने आधी त्याच्या संघाच्या कोचकडे पाहिलं. त्याच्या कोचच्या इशाऱ्याकडे बघून त्याने हे कृत्य केलं.
संबंधित प्रकार कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झालाय. आता त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवर आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श याने प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर अफगाणिस्तान संघाने बांगलादेशचा पराभव केल्यामुळे ऑस्ट्रेलिया टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. या अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशचा विजय झाला असता तर ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलची संधी मिळण्याची शक्यता होती. पण अफगाणिस्तानच्या विजयामुळे त्यांच्या सेमीफायनलच्या आशा मातीत मिळाल्या. या सर्व घडामोडींनंतर गुलबदिन नायब याच्या चिटिंग केल्याच्या व्हिडीओवर आता मिशेल मार्श याने आपली भूमिका मांडली आहे. संबंधित प्रकार हा क्रिकेटमधील सर्वाधिक मजेशीर गोष्टींपैकी एक असल्याचं मिशेलने म्हटलं आहे.
मिशेल मार्श नेमकं काय म्हणाला?
मिशेल मार्शने ‘क्रिकेट.कॉम.एयू’ला या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “हसता-हसता माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. पण अखेर त्याचा केळावर कोणताही परिणाम पडला नाही. त्यामुळे आपण आता यावर हसू शकतो. पण हे मजेदार होतं”, असं म्हणत मिशेल हसू लागला. गुलबदिन नायब याने केलेल्या कृत्यावर अनेकांकडून टीका केली जात आहे. सोशल मीडियावर युजर्सकडून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.
“आम्हाला टुर्नामेंटमध्ये खेळण्याची इच्छा होती. पण ते आमच्या हातात नव्हतं. अर्थात त्याला आम्हीच जबाबदार आहोत. बांगलादेशची शेवटची विकेट पडली तेव्हा आम्ही खूप निराश झालो. आम्ही टुर्नामेंटमध्ये पुढे कायम राहण्यासाठी खूप इच्छुक होतो. पण आता अफगाणिस्तानसाठी ते उचित आहे. अफगाणिस्तानने आम्हाला आणि बांगलादेशला हरवलं. त्यामुळे ते सेमीफायनला पोहोचण्यासाठी योग्य आणि पात्र आहेत”, अशी देखील प्रतिक्रिया मिशेल मार्शने दिली.
नेमकं काय घडलं?
बांगलादेशला 115 धावांचं आव्हान होतं. गुलबदिन नायब याने दुखापत झाल्याचं नाटक केलं त्यावेळी बांगलादेश 7 विकेट गमावून 81 धावांवर होता. पण डकवर्थ-लुईसच्या नियमानुसार बांगलादेश संघ हा 2 धावांच्या फरकाने सामन्यात मागे होता. त्यामुळे गुलबदिन नायब याने आपल्या कोचच्या इशाऱ्यावर दुखापत झाल्याचं नाटक केलं. पण त्याच नायबने नंतर दोन ओव्हारही टाकल्या आणि विजयानंतर आपल्या संघासोबत जोरदार सेलिब्रेशनही केलं.