T20 WC : टी20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला धडकी, पाच दिवसात बांधावी लागणार टीम
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. टीम इंडियाही वर्ल्डकप स्पर्धेसाठी सज्ज आहे. पण आता टीम बांधण्याचं मोठं आव्हान प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित रोहित शर्मा यांच्यापुढे आहे. त्याला कारणही तसंच आहे. पाच दिवसात टीमची बांधणी करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
मुंबई : टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी एकूण 20 संघांनी कंबर कसली आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. 1 जून ते 29 जूनदरम्यात स्पर्धेच आयोजन करण्यात आलं असून भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला असणार आहे. 9 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. पण या स्पर्धेच्या तयारीसाठी आणि टीम बांधणीसाठी हवा तसा वेळ नाही. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर हे दु:ख बोलून दाखवलं होतं. कारण भारतीय संघ या टी20 वर्ल्डकपपूर्वी एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणार नाही. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना झाल्यानंतर आयपीएल स्पर्धेची रणधुमाळी असणार आहे. बीसीसीआय सूत्रांकडून या स्पर्धेच्या तारखाही जवळपास निश्चित झाल्याचं माहिती मिळत आहे. 22 मार्च ते 26 मे या कालावधीत आयपीएल स्पर्धा असणार आहे. म्हणजेच टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्याच्या पाच दिवसांआधी आयपीएल स्पर्धा संपणार आहे. त्यामुळे पाच दिवसात टीम इंडियाची मोट बांधण्यापासून ते अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचं आव्हान असणार आहे.
भारतीय संघाचे टी20 स्टार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी आहेत. त्यामुळे त्यांची रिकव्हरी कधी कशी होते याकडे लक्ष लागून आहे. तसेच एखाद्या खेळाडूला आयपीएल दरम्यान गंभीर दुखापत झाली तर त्याच्या ऐवजी संघात दुसऱ्या खेळाडूला स्थान देण्याचं मोठं आव्हान आहे. त्याचबरोबत टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. रोहित शर्माने टी20 स्पर्धेत कमबॅक केलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धची मालिका 3-0 ने जिंकली. तसेच पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात दमदार शतक ठोकलं. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव असा प्रश्नही आहे.
आयपीएल 2024 स्पर्धा 26 मे रोजी संपणार आहे. स्पर्धा सुरु असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करावी लागेल. त्यामुळे आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघात खेळणाऱ्या खेळाडूंना एकत्र आणून त्यांच्यात एकसूत्रात निर्माण करण्याचं आव्हान आहे. टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. 10 वर्षांच्या कालावधी लोटला असून भारताची पदरी वारंवार निराशा पडली. शेवटच्या टप्प्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावल्याचं पाहायला मिळालं आहे. आतातरी आयसीसी ट्रॉफी जिंकणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.