T20 World Cup Team: रोहित-द्रविड जोडीने शमीऐवजी अश्विनला प्राधान्य का दिलं? जाणून घ्या….
T20 World Cup Team: टी 20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने काल 15 सदस्यीय टीम जाहीर केली. या टीममध्ये तीन फिरकी गोलंदाजांना स्थान दिलय.
मुंबई: टी 20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने काल 15 सदस्यीय टीम जाहीर केली. या टीममध्ये तीन फिरकी गोलंदाजांना स्थान दिलय. यात युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टया या वेगवान गोलंदाजीला अनुकूल असतात. इथे चेंडूला चांगला बाऊन्स मिळतो. मग तीन फिरकी गोलंदाजांची निवड का केली? असा प्रश्न क्रिकेटचे जाणकार विचारत आहेत.
हे समीकरण अनेकांना पटलेलं नाही
खासकरुन रविचंद्रन अश्विनच इन टीम आणि मोहम्मद शमी बाहेर हे समीकरण अनेकांना पटलेलं नाही. मोहम्मद शमी वनडे आणि टेस्ट टीममधील टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. अचूक टप्पा आणि दिशा यावर त्याचं नियंत्रण आहे. चेंडू स्विंग करण्याबरोबरच रिव्हर्स स्विंग करण्याची सुद्धा त्याची क्षमता आहे.
त्यावेळी काय घडलं?
मग ऑस्ट्रेलियात मोहम्मद शमीच्या जागी अश्विनची निवड का केली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्ष टीम निवडीच्यावेळी काय घडलं? त्याची माहिती आता समोर आली आहे. मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनचा विषय आला, त्यावेळी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड जोडीने अश्विनच्या पारड्यात आपलं मत टाकलं.
म्हणून अश्विनला झुकत माप दिलं
निवड समिती सदस्यांनी त्यांची मागणी मान्य केली. वैविध्यपूर्ण गोलंदाजीशिवाय त्याच्या अनुभवाला झुकत माप देण्यात आलं. काही टीम्समध्ये लेफ्टी फलंदाजांचा भरणा जास्त आहे. अशावेळी शमीच्या वेगापेक्षा अश्विनची फिरकी हिटिंग रोखण्यासाठी जास्त उपयोगी ठरेल, असं टीम मॅनेजमेंटच मत होतं.
बुमराह-हर्षल पटेलच्या फिटनेसबद्दल शंका?
मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी टीममध्ये निवड करण्यात आली आहे. “वर्ल्ड कपसाठी मोहम्मद शमीला स्टँडबायवर ठेवलय. याचाच अर्थ त्यांच्या मनात जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलच्या फिटनेसबद्दल शंका असू शकते. त्यामुळेच त्यांनी शमीला तयार रहाण्यास सांगितलय” असं माजी नॅशनल सिलेक्टर साबा करीम स्पोर्टस्टारवर म्हणाले. निवड समितीने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोहम्मद शमीचा विचार केलाय. याआधी शमी निवड समितीच्या रणनितीचा भाग नव्हता.