टी20 विश्वकप विजेता भारतीय टीम चक्रीवादळामुळे अडकली आहे. ज्या बारबाडोस शहरात विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला त्या शहरात चक्रीवादळ आले आहे. यामुळे भारतीय खेळाडू हॉटेलमध्येच अडकले आहे. सोमवारीच टीम इंडियाला बारबाडोस शहरातून न्यूयॉर्क शहरात पोहचणार होती. परंतु खराब वातावरणामुळे त्याचे विमान रद्द करावे लगाले. विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. आता खेळाडूंना आणण्यासाठी भारतीय क्रिकेक नियामक मंडळ (बीसीसीआय) विशेष विमान पाठवणार आहे. हवामान सुधारल्यानंतर बारबाडोस विमानतळावरील कामकाज सुरु होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ एका विशेष चार्टर्ड विमानाने थेट दिल्लीला येणार आहे.
बारबाडोसमधून बाहेर पडण्यासाठी टीम इंडियाला सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टीम इंडिया आणि भारतीय संघासोबत असणारे कर्मचारी बारबाडोसवरून थेट दिल्लीला जातील. यामुळे भारतीय संघ 3 जुलैपर्यंत देशात दाखल होणार आहे. बारबाडोस विमानतळ बंद करण्यात आले आहे. आता येथे संचारबंदीसारखी परिस्थिती आहे. कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. बेरिल वादळ येत्या 6 तासांत येणार आहे. यामुळे या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. बेरील श्रेणी 4 मधील दुसरे सर्वात तीव्र वादळ आहे.
टीम इंडिया फक्त हॉटेलमध्येच राहणार आहे. येत्या 24 तासात काय होणार हे कोणालाच माहीत नाही. प्रवासाच्या योजनेबाबत अजूनही अनिश्चितता आहे. भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सात धावांनी पराभव केला होता. त्यानंतर 17 वर्षांनी वर्ल्डकपवर भारताचे नाव कोरले गेले. यामुळे भारतीस संघात सध्या जोरदार उत्साहाचे वातावरण आहे. भारतातील क्रिकेट प्रेमी टीम इंडियाचे खेळाडू भारतात परतण्याची वाट पाहत आहेत. भारतीय संघ देशात दाखल झाल्यावर विमानतळापासून संघाची भव्य मिरवणूक काढली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारतीय संघाची मुंबईत अशी मिरवणूक काढण्यात आली होती. आता हे दृश्य दिल्लीत दिसण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाने 29 जून रोजी अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे टीम इंडियाला तसेच क्रिकेट चाहत्यांना सात महिन्यांपूर्वी कडू आठवणी विसरता येणार आहे. अहमदाबाद शहरात 19 नोव्हेंबर 2023 खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघ पराभूत झाला होता.