27 SIX,19 फोर 15 वर्षाच्या मुलाने फटकावल्या रोहित शर्मापेक्षा जास्त धावा, एकटाच विरोधी संघावर पडला भारी
वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) सर्वाधिक 264 धावा फटकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. एका 15 वर्षाच्या मुलाने या पेक्षा पण जास्त धावा केल्या आहेत.
मुंबई: वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) सर्वाधिक 264 धावा फटकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. एका 15 वर्षाच्या मुलाने या पेक्षा पण जास्त धावा केल्या आहेत. त्याने आपल्या इनिंगमध्ये रोहित पेक्षा 4 धावा जास्त केल्या. रोहित सारखीच फलंदाजी करत त्याने मोठ्या धावसंख्येची स्क्रिप्ट लिहिली. दोघांच्या या खेळीमध्ये एक मोठा फरक आहे. रोहितन या 264 धावा 50 ओव्हरच्या मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात फटकावल्या होत्या. त्याचवेळी 15 वर्षाचा सलामीवीर तन्मय सिंहने (Tanmai singh) क्लब क्रिकेटमध्ये 268 धावा केल्या आहेत. हा सामना 35 षटकांचा होता. देवराज स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना तन्मयने ग्रेटर वॅली मैदानावर आरआरसीए संघाविरुद्ध या धावा केल्या. तन्मय सिंह देवराज स्पोर्ट्स क्लबचा कॅप्टनही आहे. कॅप्टन म्हणून त्याने स्फोटक खेळी केली. ज्यामुळे क्लबला मोठ्या फरकाने विजय मिळवता आला.
4 विकेट गमावून 464 धावा
तन्मय सिंहने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्या बळावर प्रथम फलंदाजी करताना देवराज स्पोर्ट्स क्लबने 35 षटकात 4 विकेट गमावून 464 धावा केल्या. प्रतिस्पर्धी संघ आरआरसीए 32 षटकात 236 धावांवर ऑलआऊट झाला. एकट्या तन्मयने जितक्या धावा केल्या, तितक्या रन्स करणही आरआरसीएला जमलं नाही. देवराज स्पोर्ट्स क्लबने 228 धावांनी मोठा विजय मिळवला.
242 च्या स्ट्राइक रेटने धावा
15 वर्षाच्या तन्मयने 111 चेंडूंचा सामना केला. 242 च्या स्ट्राइक रेटने 268 धावा फटाकवल्या. यात 27 षटकार आणि 19 चौकार आहेत. रोहितच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
तिसऱ्यांदा 250 पेक्षा जास्त धावा
तन्मय सिंह प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. कोच ललित बिधूडी नेहमी त्याच्यावर मेहनत घेत असतात. त्याच्या 268 धावांवर ललित बिधूडी यांनी आनंद व्यक्त केला. तन्मयने पहिल्यांदा 250 ही धावसंख्या पार केलेली नाही. त्याने तिसऱ्यांदा हा टप्पा ओलांडला आहे. त्याच्यामध्ये मोठी इनिंग खेळण्याची क्षमता आहे. भविष्यात त्याच्याकडून अजून अशा इनिंग पहायला मिळतील, असं त्यांनी सांगितलं. तन्मयला भारताकडून अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये खेळायचं आहे.