Asia Cup 2022 आधीच टीम इंडियाचे दोन प्रतिस्पर्धी ढेपाळले, भारताचं काम थोडं सोप होणार
आशिया कप स्पर्धा जवळ येत आहे. भारत यावेळी 8 व्यां दा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यावेळी विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
मुंबई: आशिया कप स्पर्धा जवळ येत आहे. भारत यावेळी 8 व्यां दा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यावेळी विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा भारताचा प्रयत्न असेल. स्पर्धेत भारताच्या विजयाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा पाकिस्तानचा आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशलाही कमी लेखून चालणार नाही. भारतीय संघासाठी एक चांगली बाब म्हणजे, आशिया कपच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी दोन प्रतिस्पर्धी आधीच ढेपाळले आहेत. आमचा इशारा अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या सध्याच्या परफॉर्मन्सकडे आहे. अफगाणिस्तानचा संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. तिथे अफगाणिस्तानची कामगिरी फारशी चांगली नाहीय. झिम्बाब्वे दौऱ्यावर बांगलादेशची जी अवस्था झाली, तशीच अफगाणिस्तानची स्थिती आहे.
झिम्बाब्वे मध्ये बांगलादेशचा पराभव
बांगलादेशचा झिम्बाब्वे दौरा अलीकडेच संपला. तिथे टी 20 सीरीज मध्ये बांगलादेशचा पराभव झाला. त्यानंतर तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव झाला. या पराभवानंतर बांगलादेशचा कॅप्टन तमिम इक्बालने बांगलादेशला अजून शिकण्याची आणि सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असं म्हटलं. वनडे सीरीज आधी बांगलादेशचा टी 20 सीरीज मध्येही 2-1 ने पराभव झाला.
आयर्लंड समोर अफगाणिस्तान ढेपाळला
अफगाणिस्तानचा संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. 5 सामन्यांची टी 20 सीरीज खेळण्यासाठी अफगाणिस्तानचा संघ तिथे गेला आहे. पहिल्या दोन सामन्यातच अफगाणिस्तानचा मोठा पराभव झाला आहे. अफगाणिस्तानने आयर्लंड विरुद्ध पहिला टी 20 सामना 7 विकेटने गमावला. दुसऱ्या टी 20 सामन्यात 5 विकेटने पराभव झाला. सलग दोन पराभवानंतर अफगाणिस्तानचा आत्मविश्वास हरवला आहे. सीरीज गमावण्याचा धोका आहे.