IND vs ENG | बेजबॉलचा अहंकार चिरडलाच, पण आम्ही घाबरलो, इंग्रजांकडून कबुली
IND vs ENG | हैदराबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभूत केलं. या प्रदर्शनानंतर त्यांच्या खेळात आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. पण घडलं उलटच. त्यांनी एकामागोमाग एक चारही कसोटी सामने गमावले.
IND vs ENG | बऱ्याच अपेक्षा आणि मोठ मोठे दावे करुन इंग्लिश टीम भारतात आली होती. पण कसोटी मालिकेत त्यांचा दारुण पराभव झाला. टीम इंडियाने ही टेस्ट सीरीज 4-1 ने जिंकली. बेन स्टोक्स इंग्लंडचा कॅप्टन आहे. धर्मशाळा येथे शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये एक डाव आणि 64 धावांनी इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. या सीरीज विजयासह मायदेशात आपला दबदबा कायम असल्याच भारताने दाखवून दिलं. या पराभवामुळे इंग्लंडकडून ज्या बेजबॉलची हवा केली जाते, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. या संपूर्ण सीरीजमध्ये आमची टीम उघडी पडली, हे इंग्लंडचे मुख्य कोच ब्रँडन मॅक्कलम यांनी मान्य केलं.
इंग्लंडची टीम अलीकडच्या काळात टेस्ट क्रिकेटमध्ये एका वेगळ्या अप्रोचने खेळते. आक्रमक आणि बिनधास्त क्रिकेट खेळण्याची त्यांची नवी पद्धत आहे. याच क्रिकेटच्या आधारे भारत दौऱ्यात यश मिळवण्याची त्यांची रणनिती होती. सीरीजची ज्या पद्धतीने सुरुवात झाली, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला. हैदराबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभूत केलं. या प्रदर्शनानंतर त्यांच्या खेळात आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. पण घडलं उलटच. त्यांनी एकामागोमाग एक चारही कसोटी सामने गमावले.
‘…तसे आम्ही उघडे पडलो’
अखेरच्या धर्मशाळा कसोटीत अवघ्या 3 दिवसात इंग्लंडचा पराभव झाला. या पराभवानंतर इंग्लंडचे कोच ब्रँडन मॅक्कलम यांनी आपल्या टीमच्या कमतरता, त्रुटी मान्य केल्या आहेत. “सीरीज पुढे गेली, तसे आम्ही उघडे पडलो. यावर गंभीर चर्चा आणि विचार करण्याची आवश्यकता आहे” असं ब्रँडन मॅक्कलम म्हणाले.
मॅक्कलम यांनी कसली कबुली दिली?
आमच्या टीमच्या मनात भीती निर्माण झाली होती, हे सुद्धा मॅक्कलम यांनी कबूल केलं. टीम इंडियाने पुढे सीरीजमध्ये इंग्लंड टीमला दबावाखाली आणलं. त्यामुळे टीमच्या मनात भीती निर्माण झालेली असं मॅक्कलम यांनी सांगितलं. निकाल जरी असा लागला असला, तरी काही तरी यातून सकारात्मक घडेल, असा त्यांना विश्वास आहे. या अनुभवामुळे आमच्या टीममध्ये अजून सुधारणा होईल, असं ते मानतात.
इथेच भारतात पहिला मालिका पराभव
2022 मध्ये ब्रँडन मॅक्कलम इंग्लंडच्या टेस्ट टीमचे कोच बनले. त्यानंतर इंग्लंडची खेळण्याची पद्धत बदलली. ते अजून बिनधास्तपणे खेळू लागले. टीमला यामध्ये यश सुद्धा मिळालं. पण त्यांची खरी परीक्षा भारत दौऱ्यावर होती. त्यात ते फेल ठरले. मॅक्कलम आणि स्टोक्स यांच्या कार्यकाळात इंग्लंडला पहिल्यांदाच टेस्ट सीरीज गमवावी लागली आहे.