टीम इंडियाला मिळाला हार्दिक पांड्याचा पर्याय! टी20 वर्ल्डकपबाबत खुद्द शिवम दुबेने स्पष्टच सांगितलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात चाचपणी होत आहे. खेळाडूंनाही आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दोन सामन्यात शिवम दुबेने आपल्या कामगिरीतून दाखवून दिलं आहे. तसेच टी20 वर्ल्डकपबाबतही मोठं विधान केलं आहे.

मुंबई : भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना जिंकत भारताने मालिका खिशात घातली. दोन्ही सामन्यात शिवम दुबेची जादू दिसून आली. शिवम दुबेने दोन सामन्यात 170.83 च्या स्ट्राईक रेटने 123 धावा केल्या. तसेच गोलंदाजीतही उत्तम प्रदर्शन केलं. त्यामुळे हार्दिक पांड्याचा पर्याय मिळाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कारण धावांसोबत शिवम दुबेची गोलंदाजीतही जादू दिसलं. शिवमने 5 षटकं टाकली आणि 45 धावा देत 2 गडी बाद केले. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये त्याला संधी मिळावी यासाठी सोशल मीडियावर जोरदार चर्चा करत आहे. हार्दिक पांड्या वारंवार दुखापतग्रस्त होत असल्याने शिवम दुबेमुळे संघाची ताकद वाढेल असं एका गटाचं सांगणं आहे. अशा सर्व चर्चांमध्ये शिवम दुबेला टी20 वर्ल्डकपबाबत प्रश्न विचारण्यात आला. शिवम दुबेने या प्रश्नांचं उत्तर देत सांगितलं की, ‘मी वर्तमानात जगतो आणि माझ्या कामावर माझं लक्ष आहे.’
“पहिल्यांदा मी यावर खूपच विचार करायचो की पुढे जाऊन काय होईल. आता यातून धडा मिळाला आहे की वर्तमानात राहणं गरजेचं आहे. स्वत:ला अजून सक्षम करण्यासाठी काय करायचं यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. मी फक्त जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करत आहे. मला जे काही करायचं आहे त्यावर लक्ष्य केंद्रीत करण्याचा प्रयत्न करतो.”, असं शिवम दुबेने टी20 वर्ल्डकपबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं.
शिवम दुबेचं बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे. त्याला शॉर्ट बॉल खेळताना अडचणीचा सामना करावा लागत होता. पण अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ही अडचण दूर झाल्याचं दिसून आलं. यावर कसं काम केलं याबाबतही त्याने सामन्यानंतर सांगितलं. “जेव्हा मी देशांतर्गत क्रिकेट खेळत होतो तेव्हा गोलंदाजांवर भारी पडत होतो. पण जेव्हा आयपीएल आणि भारतीय क्रिकेट संघात आलो तेव्हा 140 किमी प्रतितासाने येणाऱ्या चेंडूंचा सामना करणं सोपं नव्हतं. यासाठी मी साइडआर्म्सवर खूप काम केलं. माझ्या मानसिकतेत बदल केला. माझ्याकडे तसं खेळणं सोपं होतं पण या ठिकाणी खेळणं कठीण जात होतं. त्यासाठी मेहनत घ्यावी लागली.”