India Won T20 World Cup 2024 : ‘या’ दिवशी भारतात परतणार वर्ल्ड चॅम्पियन्स, BCCI कडून खास व्यवस्था
India Won T20 World Cup 2024 : वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया मायदेशी कधी परतणार? हाच प्रश्न सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे. टीम इंडियाचा मायदेशी परतण्याचा दिवस आणि वेळ कळली आहे. शनिवारी 29 जूनला टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला.
T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया हरिकेन बेरिल वादळामुळे बारबाडोसमध्ये अडकली आहे. संपूर्ण भागात कर्फ्यू सारखी स्थिती आहे. एअरपोर्ट बंद करण्यात आले होते. त्यामुळे सगळ्या टीमला हॉटेलमध्येच थांबाव लागलं. ताज्या रिपोर्ट्सनुसार, हरिकेन बेरिल बारबाडोसला धडकून पुढे गेलं आहे. वादळाचा परिणाम आता हळू-हळू कमी होत आहे. पुढच्या काही तासात सर्वकाही शांत होईल. एअरपोर्टसह सर्व सुविधा पुन्हा चालू होतील. त्यानंतर रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम मंगळवारी संध्याकाळपर्यंत भारताच्या दिशेने प्रयाण करु शकते.
भारतीय टीम शिवाय वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेले परदेशी आणि भारतीय पत्रकार सुद्धा बार्बाडोसमध्ये फसले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी सांगितलं की, सध्या टीम इंडिया आणि बीसीसीआय सचिव जय शाह हॉटेलमध्येच आहेत. वादळाचा जोर कमी झाल्यानंतर बीसीसीआयने बार्बाडोसमधून निघण्यासाठी स्पेशल फ्लाइटची व्यवस्था केली आहे. काही तासात वादळाचा प्रभाव पूर्णपणे संपून जाईल असा अंदाज आहे. बार्बाडोस एअरपोर्ट मंगळवार संध्याकाळपर्यंत चालू होऊ शकतो. बार्बाडोसच्या लोकल टाइमनुसार, संध्याकाळी 6.30 वाजता संपूर्ण टीम भारतात येण्यासाठी रवाना होईल. बुधवारी रात्री 7.45 वाजेपर्यंत टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल होईल.
लाइन लावून पेपर प्लेटमध्ये डिनर करण्याची वेळ
खेळाडू आणि भारतीय पत्रकारांना बार्बाडोसमधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी जय शाह सतत प्रयत्नशील होते. त्यांनी सोमवारीच स्पेशल चार्टर्ड प्लेनने परतण्याची योजना बनवली होती. पण वादळ आणि एअरपोर्ट बंद असल्याने शक्य झालं नाही. हरिकेन बेरिल वादळामुळे टीम इंडियाला बार्बाडोसमध्ये संकटांचा सामना करावा लागला. वीज-पाणी ही व्यवस्था ठप्प झाली. एअरपोर्ट सुद्धा बंद झालं होतं. कुठल्याही खेळाडूला हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. त्याशिवाय हॉटेलमधल्या सुविधांमध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे टीम इंडियावर लाइन लावून पेपर प्लेटमध्ये डिनर करण्याची वेळ आली.
कोण हिरो ठरले?
T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल शनिवारी 29 जूनला झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि सूर्यकुमार यादवने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.