एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात परतणार टीम इंडिया, पाहा किती वाजता दाखल होणार
भारतीय संघ भारतात दाखल होणार आहे. भारतात आल्यानंतर भारतीय संघाचं जोरदार स्वागत होणार आहे. भारतीय संघ पहाटे बार्बाडोस येथून भारतात येण्यासाठी निघाले आहे. विशेष विमानाने भारतीय संघाला परत आणलं जात आहे. चक्रीवादळामुळे भारतीय संघ तेथे अडकला होता. आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
टीम इंडिया लवकरच घरी पोहोचणार आहे. रोहित शर्माच्या टीमसाठी ‘एअर इंडिया चॅम्पियन्स 24 वर्ल्ड कप’ नावाच्या एअर इंडिया बोईंग 777 विशेष चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्यात आलीये. भारतीय खेळाडू गुरुवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. त्यानंतर ते मुंबईत दाखल होतील. बेरील चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसांपासून भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला होता. आता भारतीय संघ, संघाचे सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय, BCCI अधिकारी आणि भारतीय मीडिया व्यक्तींना परत आणण्यासाठी विशेष विमान पाठवणण्यात आले आहे.
भारतात परतणार संघ
टीम इंडिया विश्वविजेता झाल्यानंतर आता भारतात परतत आहे. कर्णधार रोहित शर्मासह संघातील खेळाडूंनी त्यांच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने शनिवारी दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकलाय.
घरी परत येत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. भारतात परतण्यासाठी उशीर झाल्याने संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे 6 जुलैपासून झिम्बाब्वे विरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी हरारेला वेळेत पोहोचू शकणार नाहीत.
निवृत्तीची घोषणा
टीम इंडिया ११ वर्षानंतर विश्वविजेता झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी T20 आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये. यासोबतच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कोच म्हणून कार्यकाळ देखील संपला आहे.
#WATCH | Indian cricket team leave from Barbados. The team will reach Delhi on July 4, early morning.
The flight arranged by BCCI’s Jay Shah is also carrying the members of Indian media who were stranded in Barbados pic.twitter.com/V0ScaaojBv
— ANI (@ANI) July 3, 2024
विशेष चार्टर्ड फ्लाइटने स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:30 वाजता ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले आहे. हे विमान दिल्लीत पोहोचण्याची वेळ सकाळी 6 वाजता आहे. नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर भारतीय संघ सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे.