World Cup 2023 | पुण्यात टीम इंडिया जिंकूनही हरली?, रोहित शर्माला टेन्शन
World Cup 2023 | टीम इंडियाने पुण्यात बांग्लादेशवर दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीची सेंच्युरी खास होती. पण या मॅचमध्ये काही अशा गोष्टी दिसून आल्या की, ज्यामुळे रोहित शर्मा-राहुल द्रविड जोडीच टेन्शन वाढणार आहे. कॅप्टन रोहित शर्माला या समस्येवर लवकरच तोडगा शोधावा लागेल.
पुणे : टीम इंडियाने आणखी एक आव्हान लीलया पार केलं. वनडे वर्ल्ड कप 2023 जिंकण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघांवर टीम इंडियाने सहज विजय मिळवला. अफगाणिस्तान आणि बांग्लादेशच आव्हानही टीम इंडियाने सहज परतवून लावलं. टीम इंडियाने चालू वर्ल्ड कपमध्ये सलग 4 सामने जिंकले आहेत. टीम इंडिया बिनधास्तपणे पुढे जात आहे. बांग्लादेश विरुद्ध टीम इंडियाने पुण्यात 7 विकेटने विजय मिळवला. पण या मॅचमध्ये काही गोष्टी अशा घडल्या की, जे चांगले संकेत नाहीयत.
टीम इंडियाने चालू वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केलीय. प्रत्येक खेळाडूने आपल्या बाजूने पुरेपूर योगदान दिलय. बॅटिंग ते बॉलिंग आणि फिल्डिंगासाठी जे खेळाडू मैदानात उतरले, त्यांनी 100 टक्के प्रयत्न केले. त्याचे चांगले रिझल्ट सुद्धा मिळालेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यापासूनच हे दिसून आलं होतं. बांग्लादेश विरुद्ध सुद्धा हेच चित्र होतं. बांग्लादेश विरुद्ध काही आघाड्यांवर टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या होत्या.
पहिलं टेन्शन काय?
टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बाब म्हणजे हार्दिक पांड्याचा फिटनेस. हार्दिक पांड्यामुळे टीम इंडिया संतुलित आहे. त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. हार्दिकला बांग्लादेश विरुद्ध गोलंदाजी करताना दुखापत झाली. फिल्डिंग करताना त्याचा पाय मुरगळला. त्यामुळे 3 चेंडूनंतर त्याला मैदान सोडाव लागलं. त्यानंतर मैदानात परतला नाही. बीसीसीआयने हार्दिक बद्दल अपडेट देताना सांगितलं की, त्याला स्कॅनसाठी नेण्यात आलं होतं. हार्दिक नंतर ड्रेसिंग रुममध्ये दिसला. दुखापत फार गंभीर नाहीय, असं रोहितने सामन्यानंतर सांगितलं. ही थोडी दिलासा देणारी बाब आहे. तो पुढच्या सामन्यात खेळणार की नाही, हे अजून स्पष्ट नाहीय.
दुसरं टेन्शन
हार्दिकच्या दुखापतीनंतर दुसरी चिंता वाढणारी बाब म्हणजे मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरचा फॉर्म. दोघांच्या गोलंदाजीवर फलंदाज आरामात धावा वसूल करतायत. खासकरुन सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये दोघे धावा देतात. मधल्या ओव्हर्समध्ये काही प्रमाणात भरपाई करुन ते विकेट घेतायत. पण दोघांपैकी एकही प्रभावी वाटत नाहीय. टुर्नामेंट सुरु होण्याआधी सिराज चांगल्या फॉर्ममध्ये होता. पण वर्ल्ड कपच्या पहिल्या चार सामन्यात पहिला चेंडू किंवा त्या ओव्हरमध्ये कमीत कमी एक बाऊंड्री पडलीय. तिसरं टेन्शन
पावरप्लेमध्ये जसप्रीत बुमराह एकाबाजूने दबाव टाकतो, तर सिराज सुरुवातीच्या 3-4 ओव्हर्समध्ये धावा देतोय. बांग्लादेश विरुद्ध हेच झालं. त्याने 10 ओव्हर्समध्ये 60 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. शार्दुल ठाकूर कुठेही प्रभावी वाटत नाहीय. त्याने 9 ओव्हर्समध्ये 59 धावा देऊन 1 विकेट काढला. हार्दिकला दुखापत झाल्यामुळे रोहितला शार्दुलकडून 9 ओव्हर्स टाकून घ्याव्या लागल्या.