भारताला भिडण्याआधी पाकिस्तानची इज्जत निघाली, थायलंडकडून लज्जास्पद पराभव
बलाढ्य पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात मोठा झटका
मुंबई: महिलांच्या T20 आशिया कपमध्ये पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागला. रोमांचक सामन्यात थायलंडने पाकिस्तानचा पराभव केला. टी 20 मध्ये त्यांनी एका मोठ्या टीम विरुद्ध विजय मिळवला. थायलंडने एक चेंडू राखून पाकिस्तानवर विजय मिळवला.
किती विकेटने मॅच जिंकली?
पाकिस्तानने प्रथम बॅटिंग केली. त्यांनी थायलंडसमोर विजयासाठी 117 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आपल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर थायलंडने विजयी लक्ष्य गाठलं. थायलंडच्या टीमने 4 विकेटने हा सामना जिंकला.
अनुभवाच्या बाबतीत थायलंडच्या फलंदाजांपेक्षा सरस
117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडच्या महिला टीमला लास्ट ओव्हरमध्ये 10 धावा करायच्या होत्या. 6 चेंडूत विजयासाठी 10 धावा. पाकिस्तानची बाजू वरचढ वाटत होती. कारण पाकिस्तानचे गोलंदाज अनुभवाच्या बाबतीत थायलंडच्या फलंदाजांपेक्षा सरस होते. डायना बेग ही पाकिस्तानची अनुभवी गोलंदाज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये तिला 10 धावा डिफेंड करता आल्या नाहीत.
थायलंडच्या ओपनरचा विजयात महत्त्वाचा रोल
पाकिस्तानवरील विजयात थायलंड महिला क्रिकेट टीमची सलामीवीर नथकम चंथनने महत्त्वाची भूमिका बजावली. नथकमने 51 चेंडूत 61 धावा फटकावल्या. तिलाच प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
पाकिस्तानी फलंदाजांचा स्ट्राइक रेट धीमा
थायलंडच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 117 धावा केल्या. याआधी पाकिस्तानच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 116 धावा केल्या. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने सर्वाधिक 56 धावा केल्या. तिचा स्ट्राइक रेट फक्त 87.50 होता. थायलंडकडून झालेला पराभव हा भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी पाकिस्तानसाठी झटका आहे.