12 धावा 4 विकेट, पण तरीही मॅच सोडली नाही, शेवटच्या ओव्हर मध्ये श्वास रोखून धरायला लावणारा सीन
क्रिकेटचा फॉर्मेट जितका छोटा, अटी-तटीचा, रोमांचक सामना होण्याची शक्यता तितकीच जास्त. इंग्लंड मध्ये सध्या 100 चेंडूंची टुर्नामेंट 'द हण्ड्रेड' सुरु आहे.
मुंबई: क्रिकेटचा फॉर्मेट जितका छोटा, अटी-तटीचा, रोमांचक सामना होण्याची शक्यता तितकीच जास्त. इंग्लंड मध्ये सध्या 100 चेंडूंची टुर्नामेंट ‘द हण्ड्रेड’ सुरु आहे. या स्पर्धेत लंडन स्पीरिट आणि ओव्हल इन्विंसिबल या दोन संघांमध्ये एक सामना झाला. या सामना अक्षरक्ष: क्रिकेटचा रोमांच आणि थराराने भरलेला होता. सुरुवातीला विकेट, मधल्या षटकात जोरदार फटकेबाजी आणि शेवटच्या षटकात श्वास रोखून धरायला लावणारे क्षण. कोणाला असा सामना पहायला आवडणार नाही?
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंडन स्पीरिटने 100 चेंडूत 6 विकेट गमावून 171 धावा केल्या. ओव्हल इन्विंसिबल समोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ओव्हल इन्विंसिबलला सुरुवातीला चांगलेच झटके बसले. पण या टीमने हार मानली नाही. ओव्हल इन्विंसिबलने शेवटच्या षटकापर्यंत हा सामना खेचला. ‘द हण्ड्रेड’ स्पर्धेत एक ओव्हर 5 चेंडूंची असते.
12 धावा 4 विकेट, पण तरीही संघ लढला
कॅप्टन मॉर्गनच्या 29 चेंडूतील 47 धावांच्या खेळीच्या बळावर लंडन स्पीरिटने मोठी धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी लंडन स्पीरिटचा संघ मैदानात उतरला, तेव्हा गोलंदाजांनी चांगली सुरुवात दिली. ओव्हल इन्विंसिबलचे टॉप 4 फलंदाज अवघ्या 12 धावात बाद झाले. लक्ष्य मोठं होतं. अवघड वाटणारं हे लक्ष्य ओव्हल इन्विंसिबलने जवळपास गाठलच होतं
मधल्याफळीतील फलंदाज जॉर्डन कॉक्स, हिल्टन, टॉम करन आणि डॅनी ब्रिग्सने जोरदार संघर्ष केला. हे चौघे मिळून टीमला 12/4 वरुन संघाला विजयाच्या जवळ घेऊन गेले. फक्त 3 धावांनी त्यांची विजयाची संधी हुकली. हा सामना इतका रोमांचक झाला की, सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला.
श्वास रोखून धरायला लावणारं शेवटचं षटक
शेवटच्या षटकात 5 चेंडूत ओवल इन्विंसिबलला विजयासाठी 17 धावा करायच्या होत्या. डॅनी ब्रिग्स क्रीजवर होता. सामना कोणाच्या बाजूने झुकेल याचा अंदाज बांधता येत नव्हता. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ सुरु झाला. डॅनी ब्रिग्स स्ट्राइकवर तर लंडन स्प्रिटकडून थॉम्पसनच्या हाती चेंडू होता.
पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर 4 रन्स आले. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. शेवटच्या 2 चेंडूत विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती. इथे सामना टाय झाला तर टाय. नियमांमध्ये सुपर ओव्हरची तरतूद नाहीय. द हण्ड्रेड मध्ये सुपर ओव्हर नॉकआऊट स्टेज मध्ये रंगते. या सामन्यात शेवटच्या 2 चेंडूतही खूप रोमांचक खेळ पहायला मिळाला.
चौथ्या चेंडूवर 1 धाव निघाली. 5 वा आणि मॅचचा शेवटचा चेंडू नो बॉल टाकला. म्हणजे शेवटच्या चेंडूवर फ्री हिट. ओवल इन्विंसिबलच्या फलंदाजाला त्याचा फायदा उचलता आला नाही. त्याने फक्त 1 धावा केली. अशा प्रकारे फक्त 3 रन्सनी लंडन स्पीरिटने हा सामना जिंकला.