हार्दिक पंड्याच्या नावावर एकमत नाही, हा अनुभवी खेळाडू होणार भारताचा पुढील टी-20 कर्णधार
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे आता भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हार्दिक पांड्याच्या नावावर एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता कोणाच्या गळ्यात माळ पडणार याबाबत नवं नाव समोर आलं आहे.
भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याच्या सोबत विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी देखील टी२० मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात हा वर्ल्डकप खेळाला होता. पण रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केल्याने आता टी२० संघाचा कर्णधार कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरला ही जबाबदारी देण्यात आली आहे. आता गंभीर प्रशिक्षक झाल्याने तो कोणाच्या नावाला पसंती देतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भारताचा पुढचा कर्णधार कोण असेल? याबद्दल अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे. या पदासाठी काही नावांची चर्चा आहे. पण माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे बीसीसीआय ठरवणार आहे.
संघ श्रीलंका दौऱ्यावर
सध्या अनुभव खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याबा बनवण्यात आले आहे. भारतीय संघाने झिम्बॉम्बे विरुद्ध टी२० मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. २७ जुलैपासून हा दौरा सुरू होणार आहे. 27 ते 30 जुलै दरम्यान पल्लिकेलमध्ये तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये एकदिवसीय मालिका होणार आहे. पण या सीरीजसाठी कोणाला कर्णधार केलं जाणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
पांड्याच्या नावावर एकमत नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समिती तसेच गौतम गंभीर यांच्यात हार्दिक पांड्याच्या नावावर एकमत झाले नसल्याचे कळते आहे. याचे कारण म्हणजे त्याचा फिटनेस. त्यामुळे त्याला T20 कर्णधार म्हणून नियुक्त करण्यावरून एकमत झालेले नाही. खराब तंदुरुस्तीमुळे जर हार्दिक मध्येच बाहेर पडला तर त्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो असं निवड समितीला वाटतंय. भारतीय संघाला T20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात हार्दिक पांड्याची भूमिका महत्त्वाची होती. आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याला अनेकदा गंभीर दुखापतींमुळे बाहेर राहावे लागले आहे. T20I कर्णधारपदाचा अंतिम निर्णय आता नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर घेणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करताना गंभीरने सूर्यकुमार यादवसोबत काम केले आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही गोष्ट खूपच नाजूक आहे. कारण अनेक चेहरे स्पर्धेत आहेत. निवड समिती, बीसीसीआय आणि गंभीर यांच्यात देखील एकमत अजून होऊ शकलेले नाही. पण गौतम गंभीरकडून सूर्यकुमार यादवच्या नावाला सहमती दिली जाऊ शकते. भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी आता तो प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सूर्यकुमारचं नाव आघाडीवर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतरच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान संघाचे नेतृत्व केले आहे.
पांड्या वनडे नाही खेळणार
वैयक्तिक कारणांमुळे हार्दिक पांड्या याने ऑगस्टमध्ये होणारी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार नसल्याचं कळवलं आहे. पंड्याने वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक घेतल्याचं कळतं आहे. याबाबत त्याने कर्णधार रोहित शर्माला माहितीही दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळल्यास सर्व स्टार क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. रोहित, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना सूट देण्यात आली आहे. यानंतर संघाला बांगलादेश आणि न्यूझीलंडसोबत कसोटी मालिका खेळायची आहे.