Mumbai Indians IPL 2022: टिम डेविड जे बोलून गेला, ते वाचल्यावर तुम्ही सुद्धा म्हणाल, रोहित शर्मा चुकलाच
Mumbai Indians IPL 2022: आयपीएलच्या या सीजनमध्ये कदाचित त्याच्याकडून चूक झाली व त्याला टिम डेविडच टॅलेंट ओळखता आलं नाही. टिम डेविडला जास्त संधी मिळाली असती, तर कदाचित मुंबई इंडियन्सची आज ही स्थिती नसती.
मुंबई: मुंबई इंडियन्सने IPL 2022 मध्ये सलग आठ सामने हरल्यानंतर आता दोन मॅच जिंकल्या आहेत. मुंबई इंडियन्सने पॉइंटस टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि नंतर पहिल्या नंबरवरील टीम गुजरात टायटन्सला (Guajarat Titans) हरवलं. शुक्रवारी रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला नमवलं. टिम डेविड (Tim David) या विजयाचा हिरो ठरला. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. डेविडने 21 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. यात चार षटकार आणि दोन चौकार होते. टिम डेविडला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. विजयानंतर टिम डेविड अशी एक गोष्ट बोलून गेला, ज्यामुळे रोहित शर्माच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.
टिम डेविड खूप सूचक बोलला
“जिंकल्यानंतर खूप छान वाटतय. तुमच्या टीमला योग्य रिझल्ट मिळत नसताना, मैदानाच्या बाहेर बसणं खूप कठीण असतं. नेट्स मध्ये मेहनत करण्याची आणि संधी मिळेल, तेव्हा चांगलं प्रदर्शन करण्याची गरज आहे” असं टिम डेविड म्हणाला. टिम डेविडला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली होती. पण त्याने चमकदार कामगिरी केली नाही, म्हणून त्याला बाहेर बसवलं. त्यानंतर लखौन आणि गुजरात टायटन्स विरुद्ध त्याला पुन्हा संघात संधी मिळाली, तेव्हा त्याने मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
टिम डेविडला ओळखण्यात रोहित शर्मा चूकला
रोहित शर्मा खेळाडूंवर विश्वास दाखवून त्यांच्याकडून सर्वोत्तम प्रदर्शन करुन घेण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे आतापर्यंत पाचवेळा त्याने मुंबई इंडियन्सला आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं व आता टीम इंडियाचं नेतृत्व त्याच्याकडे आहे. आयपीएलच्या या सीजनमध्ये कदाचित त्याच्याकडून चूक झाली व त्याला टिम डेविडच टॅलेंट ओळखता आलं नाही. टिम डेविडला जास्त संधी मिळाली असती, तर कदाचित मुंबई इंडियन्सची आज ही स्थिती नसती. मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमधून आधीच बाहेर झाला आहे. आता फक्त पॉइंटस टेबलमध्ये चांगल्या पोझिशनवर पोहोचणं एवढाच उद्देश आहे.
शेवटच्या षटकात खेळ पलटला
कालच्या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास गुजरात टायटन्सचा संघ जिंकण्याच्या स्थितीमध्ये होता. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना फक्त 9 धावा हव्या होत्या. क्रीझवर राहुल तेवतिया आणि डेविड मिलरची जोडी होती. हे दोघे असताना, गुजरात सहज जिंकेल असं वाटत होतं. पण डॅनियल सॅम्सच्या तिसऱ्या चेंडूवर तेवतिया रनआऊट झाला. डेविड मिलर-राशिद खान सारखे हिटरही गुजरातला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. गुजरातच्या टीमने अखेरच्या षटकात फक्त 3 धावा केल्या.