बाऊन्सर चेंडू, हार्ट अटॅकमुळे ‘या’ पाच क्रिकेटपटूंच मैदानातच संपलं आयुष्य, यामध्ये आहे एक भारतीय क्रिकेटपटू
भारत-श्रीलंकेदरम्यानच्या दुसऱ्या टी-20 (India vs Srilanka) सामन्यादरम्यान इशान किशनच्या डोक्याला चेंडू लागला. सुदैवाने त्याने हेल्मेट घातलेले असल्याने इशानला गंभीर इजा झाली नाही.
कांगडा: भारताचा आक्रमक डावखुरा फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) सध्या रुग्णालयात दाखल आहे. काल भारत-श्रीलंकेदरम्यानच्या दुसऱ्या टी-20 (India vs Srilanka) सामन्यादरम्यान इशान किशनच्या डोक्याला चेंडू लागला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराचा बाऊन्सर चेंडू (Bouncer ball) इशान किशनच्या डोक्यावर आदळला. सुदैवाने त्याने हेल्मेट घातलेले असल्याने इशानला गंभीर इजा झाली नाही. इशान किशनच्या डोक्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं आहे. पण त्यात गंभीर दुखापत झाली नसल्याचं डॉक्टरांना आढळून आलं आहे. इशानची प्रकृती आता चांगली आहे. क्रिकेटच्या मैदानावर घडलेली ही पहिली घटना नाही. यापूर्वी सुद्धा बाऊन्सर चेंडूंनी नुसतं फलंदाजांना जखमीच केलेलं नाही, तर त्यांचं आयुष्य संपवलं आहे. क्रिकेटच्या मैदानात बाऊन्सर चेंडूमुळे किंवा अन्य कुठल्या कारणामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पाच क्रिकेटपटूंबद्दल आपण जाणून घेऊया.
- 2014 मध्ये फिल ह्यूज हा ऑस्ट्रेलियन फलंदाज बाऊन्सर चेंडू डोक्याला लागल्याने मैदानातच कोसळला होता. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स दरम्यान सामना सुरु असताना ही घटना घडली होती. त्याच्या कवटीला फ्रॅक्चर झालं होतं. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. सिडनीच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण त्याचा उपयोग झाला नाही. दोन दिवसांनी फिल ह्यूजचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी फिलचे वय 25 होते.
- डॅरेन रँडल हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू. 2013 मध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना त्याच्या डोक्याला बाऊन्सर चेंडू लागला होता. डॅरेन पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला हा बॉल लागला होता. डॅरेन हा विकेटकिपर-फलंदाज जागेवरच कोसळला होता. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. डॅरेन 32 वर्षांचा होता.
- स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळताना जुल्फिकार भट्टी या पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या छातीत बॉल लागला होता. जुल्फिकार मैदानावरच कोसळला होता. रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. 2013 सालची ही घटना आहे. जुल्फिकार 22 वर्षांचा होता.
- रिचर्ड ब्यूमोंट हा इंग्लिश क्रिकेटपटू आहे. मैदानावर खेळत असताना तो अचानक कोसळला. ह्दयविकाराच्या झटक्यामुळे रिचर्ड भर मैदानात कोसळला. रुग्णालयात नेल्यानंतर रिचर्ड ब्यूमोंटला डॉक्टरांनी मृत घोषित केले. 2012 सालची ही घटना आहे. रिचर्ड त्यावेळी 33 वर्षांचा होता.
- रमण लांबा हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. ढाक्यामध्ये एका सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना फलंदाजाने फटकावलेला चेंडू त्यांच्या डोक्याला लागला. मैदानावरच कोसळलेल्या रमण लांबा यांना रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस ते कोमामध्येच होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला. 1998 सालची ही घटना आहे. रमण लांबा त्यावेळी 38 वर्षांचे होते.