Ranji Trophy | मुंबई विरुद्ध मॅच खेळण्याआधी एकच राज्याच्या दोन टीममध्ये मोठा राडा, अधिकाऱ्याच फोडलं डोकं
Ranji Trophy | मुंबईच्या रणजी सामन्याआधी मोठा राडा झाला. एकाच राज्याच्या दोन टीम्स मुंबई विरुद्ध सामना खेळण्यासाठी स्टेडियमबाहेर पोहोचल्या होत्या. अशावेळी कुठल्या टीमला मुंबई विरुद्ध खेळण्याची परवानगी मिळाली? कोणाच डोक फुटलं? या बद्दल जाणून घ्या.
Ranji Trophy | सध्या रणजी ट्रॉफीचा सीजन सुरु झाला आहे. मुंबई विरुद्ध रणजी सामना खेळण्यासाठी एकाच राज्याच्या दोन टीम स्टेडियमबाहेर पोहोचल्या. त्यानंतर जे घडलं, ते खूपच धक्कादायक आहे. पाटनाच्या मोइनुल स्टेडियमवर अनेक वर्षानंतर रणजी सामना होत आहे. मुंबई आणि बिहार या एलिट ग्रुपमधील दोन टीम्समध्ये ही मॅच होत आहे. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सोशल मीडियावर मोइनुल हक स्टेडियमचे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. स्टेडियमची जी अवस्था आहे, त्यावर टीका करण्यात आली. माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांचा एक व्हिडिओ रिपोस्ट करण्यात आला. स्टेडियममधील व्यवस्थेवर टीका करण्यात आली आहे.
त्याशिवाय मुंबई विरुद्ध बिहार सामना आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला. बिहार क्रिकेट असोशिएशनमधील अंतर्गत वाद. मुंबई विरुद्ध 5 जानेवारीपासून सुरु झालेला हा सामना खेळण्यासाठी बिहारच्या दोन टीम्स पोहोचल्या होत्या.
एकाच राज्याच्या दोन टीम्स कशा?
बिहार क्रिकेट एसोसिएशनने दोन-दोन टीम्सची यादी जारी केली होती. बिहार क्रिकेट एसोसिएशनचे (BCA) अध्यक्ष राकेश तिवारी यांनी एका टीमची यादी जारी केली. तर दुसऱ्या टीमची यादी बर्खास्त सचिव अमित कुमार यांनी जारी केली.
कुठल्या टीमला मैदानावर खेळण्याची परवानगी?
दोघांपैकी कुठली टीम मुंबईचा सामना करणार यावरुन बीसीएमध्येच अंतर्गत वाद होता. सकाळी बीसीएच्या दोन्ही टीम्स स्टेडियम बाहेर पोहोचल्या. सचिव गटाच्या टीमला पोलिसांनी सक्तीनेच बसमध्ये बसवून बाहेर पाठवून दिलं. त्यानंतर बीसीए अध्यक्ष राकेश तिवारी यांनी जारी केलेल्या लिस्टमधील खेळाडूंना मैदानावर सामना खेळण्याची परवानगी दिली.
बीसीएच्या ओएसडीवर हल्ला
काही अज्ज्ञात लोकांनी बीसीएचे ओएसडी मनोज कुमार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना मारहाण केली. या दरम्यान काहींनी दगडाने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यात ते जखमी झाले. या घटनेनंतर बिहार क्रिकेट असोशिएशनकडून सांगण्यात आलं की, सर्व दोषींची ओळख पटवण्यात येत आहे. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. बीसीएमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अंतर्गत वाद आहेत.