T20 World Cup 2024 : ‘भारतासाठी तुम्ही खास…’, सेमीफायनलआधी यूके, ऑस्ट्रेलियाचे ICC वर गंभीर आरोप
T20 World Cup 2024 : टीम इंडिया, अफगाणिस्तान हे आशिया खंडातील संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. अफगाणिस्तानने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघांना धक्के दिले. हे ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील मीडिया समूहांना चांगलच झोंबल आहे. त्यांनी आता आयसीसीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलं आहे.
T20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलमधील चार संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या चार टीम्स उपांत्यफेरीत भिडणार आहेत. 27 जूनला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये पहिला सामना तर टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. उद्या हे सेमीफायनलचे सामने होणार आहे. मात्र, त्याआधी मैदानाबाहेर मात्र वादांची मालिका सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC भारतातील टीव्ही प्रेक्षकांना प्राधान्य देत आहे असा आरोप यूके आणि ऑस्ट्रेलियामधील मीडिया समूहांनी केला आहे. सेमीफायनल सामन्यांच्या आयोजनाच वेळापत्रक या वादांच्या केंद्रस्थानी आहे. अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्यावेळी पाऊस झाला, तर राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण तेच भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यावेळी पाऊस झाला, तर त्यासाठी राखीव दिवस नाहीय. भारत-इंग्लंड सामना वेस्ट इंडिजच्या गुयाना येथे होणार आहे.
गुयानामध्ये सध्या पावसाळी वातावरण आहे. उद्या टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल मॅचच्यावेळी पावसाची शक्यता आहे. पाऊस या संपूर्ण सामन्यावर पाणी फिरवण्याची भिती आहे. पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही, तर सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडियाने आपले तिन्ही सामने जिंकले होते. त्या आधारावर टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरेल. म्हणून ब्रिटीश मीडियाकडून आयसीसीवर टीका सुरु आहे. भारताच्या सेमीफायनल सामन्याच स्थान आणि वेळ आधीच ठरलेली होती. भारतातून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा सामना पहावा, याला प्राधान्य देण्यात आलय असा आरोप डेली मेल या ब्रिटीश मीडियाने केला आहे. संघटनात्मक अखंडतेपेक्षा दक्षिण आशियातील टीव्ही प्रेक्षकांना प्राधान्य देण्यात आल्याच डेली मेलने म्हटलय.
भारताच वर्चस्व खुपतय
ऑस्ट्रेलियन पब्लिकेशन ‘द रोअर’ने सुद्धा हाच मुद्दा मांडला. सामन्यांच जे वेळापत्रक आहे, सकाळी आणि रात्री उशिराचे सामने त्याकडे लक्ष वेधलं. भारतीय प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊनच अशा पद्धतीने सामने आयोजित केल्याच ‘द रोअर’ने म्हटलय. या रणनितीवरुन भारताच्या आर्थिक क्षमतेचा ICC वर असलेला प्रभाव दिसून येतो, असही म्हटलय. आयसीसीवर आधी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांच वर्चस्व होतं. पण मागच्या काही वर्षात भारताच वर्चस्व वाढलय. सहाजिक आहे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज सर्वाधिक पैसा भारतातून येतोय.