मुंबई : क्रिकेट(Cricket)मध्ये आजकाल फॅब फोर (Fab 4) निवडण्याचा ट्रेंड जोरात सुरूय. प्रत्येकजण आपला फॅब फोर निवडतोय. फॅब फोरमध्ये विराट कोहली(Virat Kohli)सोबत स्टीव्ह स्मिथ(Steve Smith), केन विल्यमसन (Kane Williamson), जो रूट (Joe Root) आणि बाबर आझम (Babar Azam) यांची नावं आहेत. पण, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या यादीत असं अजिबात नाहीय. कांबळी(Vinod Kambli)च्या फॅब फोरच्या यादीत विराट कोहली आहे, पण बाकीची नावं गायब आहेत. आता प्रश्न असाय,की कांबळीनं आपला क्रिकेटचा फॅब फोर म्हणून आणखी कोणाची निवड केलीय?
विनोद म्हणतो…
सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar)च्या अधिकृत अॅप 100MBवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विनोद कांबळीनं क्रिकेटच्या फॅब फोर संदर्भात आपलं उत्तर दिलंय. 100MBनं ट्विट करत म्हटलं,की क्रिकेटमधला तुमचा फॅब फोर कोण? या प्रश्नाचं उत्तर अनेक क्रिकेट चाहत्यांनी दिलं, विनोद कांबळीचं उत्तर मात्र भन्नाटच होतं.
विनोद कांबळीचा ‘फॅब फोर’
डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यानं विराट कोहलीचा क्रिकेटच्या फॅब फोरमध्ये समावेश केलाय. मात्र स्मिथ, विल्यमसन, बाबर, रूट या सर्व फलंदाजांना त्याच्यापासून दूर ठेवलंय. विराट व्यतिरिक्त कांबळीनं आपल्या फॅब फोरमध्ये सुनील गावस्कर, विव्ह रिचर्ड्स आणि सचिन तेंडुलकर यांना स्थान दिलंय.
My Fab 4 would be
Sunil Gavaskar
Sir Vivian Richards
Sachin Tendulkar
Virat Kohli#VKsFabFour https://t.co/vKBX6IHoja— Vinod Kambli (@vinodkambli349) December 20, 2021
कांबळीच्या फॅब फोरमध्ये 3 भारतीय
विनोद कांबळीचा फॅब फोर पाहता, सध्याच्या फलंदाजांचा विचार न करता ऑल टाइम फॅब फोर निवडलाय, असं दिसतं. म्हणूनच त्यानं आपल्या फॅब फोरमध्ये 70-80च्या दशकातले दोन फलंदाज ठेवलेत. 90च्या दशकातल्या सचिन तेंडुलकरची निवड करताना सध्याच्या विराट कोहलीलाही स्थान दिलंय. विशेष म्हणजे त्याच्या फॅब फोरमध्ये 3 भारतीय आहेत.
कारकिर्दीला सुरुवात धमाकेदार
विनोद कांबळीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची जोरदार सुरुवात झाली. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटीत त्यानं द्विशतक झळकावलं होतं. यानंतर पुढच्या कसोटीत झिम्बाब्वेविरुद्ध 227 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या पुढच्या कसोटी मालिकेत त्यानं दोन शतकं झळकावली. वाढदिवसाच्या दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना शतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटर आहे.