नवी दिल्ली : आयपीएल सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादाची सध्या जोरदार चर्चा आहे. लखनऊन सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यानच्या सामन्यात कोहली आणि गंभीर दरम्यान शाब्दिक चकमक उडाली. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे इतर खेळाडूंना हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा लागला. या वाद आता थांबला असला तरी त्याच्या ठिणग्या अधूनमधून उडताना दिसत आहेत. या वादावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएल आणि भारतीय क्रिकेटसाठी असे वाद मुळीच चांगले नाहीत, असं या माजी खेळाडूंनी म्हटलं आहे.
टीम इंडियाचा स्टार आणि माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानेही या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. युवराजने सोशल मीडियावरून कोहली आणि गंभीर यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. युवराजने आपल्या ट्विटर हँडलवरून या वादावर भाष्य केलं आहे. त्याने हे ट्विट करताना सोबत एक कोल्ड ड्रिंग ब्रँडही टॅग केला आहे. मला वाटतं ब्रँडला गौती आणि चीकूने आपल्या कॅम्पेनसाठी साईन केलं पाहिजे, असं युवराजने म्हटलं आहे. विशेष म्हणजे हे ट्विट करताना युवराजने कोहली आणि गंभीरला टॅगही केलं आहे. युवराजने या दोघांनाही शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हे दोघे युवराजचा सल्ला मानतात का हे पाहावं लागणार आहे.
युवराज सिंग हा जॉली स्वभावाचा क्रिकेटपटू आहे. चेष्टा, मस्करी करण्याचा त्याचा स्वभाव आहे. टीम इंडियाकडून खेळत असतानाही युवराज चेष्टा, मस्करी करून अनेकांची टोपी उडवायचा. त्यामुळे संघातील वातावरण हसतं खेळतं राहायचं. गंभीर आणि कोहलीसोबतही युवराज खेळलेला आहे. त्यामुळे युवराजच्या या ट्विटवर गंभीर आणि कोहली रिअॅक्ट करतात का हे पाहावं लागेल.
लखनऊन आणि आरसीबीच्या दरम्यानच्या सामन्यात कोहलीचा वाद अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हक याच्याशी झाला होता. त्याची तक्रार अमित मिश्राने अंपायरकडे केली होती. विराट कोहली त्रास देत असल्याची तक्रार अमितने केली होती. दोन्ही संघातील हा सामना लो स्कोअरिंग होता. आरसीबीने केवळ 126 धावा करून हा सामना जिंकला होता. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू मैदानात एकमेकांना हात मिळवत होते. गौतम गंभीरही मैदानात आला होता.
I think #Sprite should sign #Gauti and #Cheeku for their campaign #ThandRakh ?? what say guys? ? @GautamGambhir @imVkohli @Sprite
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) May 4, 2023
सामान संपल्यानंतर कोहली कायल मेयर्ससोबत बोलत होता. यावेळी गंभीरने या दोघांनाही वेगवेगळं केलं. त्यामुळे वाद झाला. मैदानातच कोहली आणि गंभीरमध्ये जुंपली. त्यानंतर या दोघांच्या भांडणावर सोशल मीडियातूनही जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.