अहमदाबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs west indies) यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर (West indies) सहा गडी राखून विजय मिळवला. भारताने या सामन्यात सहज विजय मिळवला असं दिसतं असलं तरी, मध्ये गडबड झाली होती. रोहित शर्मा बाद (60) झाल्यानंतर विराट, (8) इशान किशन (28) आणि ऋषभ पंत (11) ठराविक धावांच्या अंतराने बाद झाले. बिनबाद 84 अशा स्थितीमध्ये असलेल्या भारताची चार बाद 116 अशी स्थिती झाली होती. पण सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डाने डाव सावरला व भारताला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवले. माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यावरुन आता त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. या टीकाकारांमध्ये माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) आघाडीवर आहे.
विराटचं मन सध्या थाऱ्यावर नाही, त्यात काहीतरी गडबड आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहलीची 4 चेंडूत संपलेली खेळी पाहून भारताचा माजी सलामीवीर दुखावला आहे. तो म्हणाला की, माझे हे मत केवळ वेस्ट इंडिजविरुद्धच्या डावाशी संबंधित नाही. हीच गोष्ट भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरदेखील पाहायला मिळाली. आकाश चोप्रा म्हणाला की, अर्थातच विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत यापूर्वी सर्वाधिक धावा केल्या आहेत, पण ती गोष्ट त्याच्या फलंदाजीत दिसली नाही, ज्यामुळे कोहली विराट बनतो. वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजी करतानाही तो घाईत दिसला होता.
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने 4 चेंडूत 8 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 चौकार लगावले. यानंतर अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर केमार रॉचकडे झेल देत विराट माघारी परता.
आकाश चोप्राने ESPNcricinfo शी बोलताना सांगितले की, “कोहली ज्या प्रकारे आऊट झाला ते खूपच धक्कादायक होते. माझ्या मते तो जरा घाईत दिसत होता. अर्थात विराट लगेच खेळपट्टीचा अंदाज घेऊन सेट होतो. ही त्याची खासियत आहे, त्यामुळेच त्याने इतक्या धावा केल्या आहेत. पण आज पुन्हा एकदा तो चुकला. विराट ज्या प्रकारचे शॉट्स खेळून आऊट झाला, ती गोष्ट त्याच्या इमेजला शोभत नाही.”
भारताचा माजी सलामीवीर म्हणाला, “कोहलीने 4 चेंडूत आऊट होणे थोडे आश्चर्यकारक होते. मला असे वाटते की त्याचे मन सध्या थाऱ्यावर नाही. आपण त्याच्या 4 चेंडूंच्या डावानंतर त्याच्या तंत्राबद्दल काहीही बोलू शकत नाही. त्याच्या क्षमतेबद्दल तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत चूक कुठे होतेय हे पाहावे लागेल. पण एक गोष्ट आहे. विराटची जुनी शैली कुठेतरी हरवतेय असं मला वाटतं.”
आकाश म्हणाला की, “विराटची वेस्ट इंडिजविरुद्धची ती चार चेंडूंची खेळी पाहून मी म्हणेन की, विराटचं चित्त थाऱ्यावर नाही. तो त्याच्या खेळाबद्दल कॉन्फिडंट नाही.”
इतर बातम्या
IND vs WI: ‘मी संघातील सदस्यांना सांगिन की…’,पहिल्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला….
IND vs WI: भारताने 1000 वा वनडे सामना जिंकला, चहल-वॉशिंग्टन भारताच्या ‘सुंदर’ विजयाचे ‘हिरो’