Umran Malik: ‘विकेटकीपर लांब उभा होता, आम्ही ड्रेसिंग रुममध्ये बसलेलो, त्यावेळी….’ उमरानच्या थरारक बॉलिंगचा किस्सा
Umran Malik: “वेगाशी कधीही तडजोड करु नकोस. हे शस्त्र आहे, ज्याने तू कधीही फलंदाजावर दहशत निर्माण करु शकतोस”
पुणे: सध्या टीम इंडिया आणि श्रीलंकेत 3 T20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. या सीरीजमध्ये एका खेळाडूची सर्वाधिक चर्चा आहे, तो म्हणजे उमरान मलिक. या सीरीजमध्ये उमरान मलिकने त्याच्या वेगाने दहशत निर्माण केलीय. मुंबईत झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात दोन, तर पुण्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याने तीन विकेट घेतले. उमरानने कालच्या सामन्यात चार ओव्हर्समध्ये 48 धावा देऊन 3 विकेट काढल्या. त्याने भानुका राजपक्षा आणि वानिंदु हसरंगा यांना ज्या पद्धतीने बोल्ड केलं, त्याला तोड नाही. उमरानने भले धावा दिल्या असतील, पण त्याने काढलेल्या या दोन विकेट पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा त्याचं कौतुक करालं. सीरीजमध्ये 140 KMPH, 150KMPH वेगाने तो गोलंदाजी करतोय.
कधी फियाटकडे स्विच होऊ नकोस
उमरान मलिक आता अवघ्या 23 वर्षांचा आहे. जम्मूच्या गुज्जर नगरमधील एका फळविक्रेत्याच्या या मुलाने आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाड डेल स्टेन यांनी उमरान मलिकला सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना पाहिलं. त्यांनी त्याला आणखी वेगवान गोलंदाजीसाठी प्रोत्साहित केलं. डेल स्टेनने उमरान मलिकला एक गोष्ट सांगितली होती. उमरानचा जम्मूमधील मित्र रमन थपलूने हा किस्सा सांगितला. “तुझा जन्म हा फरारी चालवण्यासाठी झालाय. कधी फियाटकडे स्विच होऊ नकोस” असं स्टेन उमरानला म्हणाले होते.
उमरानच्या गोलंदाजीची दाहकता सांगणारी गोष्ट
जम्मू-काश्मीरचे फिल्डिंग कोच तन्मय श्रीवास्तव यांनी उमरानच्या भेदक गोलंदाजीचा एक किस्सा सांगितला. तन्मय हे भारताकडून अंडर 19 क्रिकेट खेळले आहेत. 90 फर्स्ट क्लास सामन्यांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. उमरान मलिकचे चेंडू कलेक्ट करताना विकेटकीपरच्या ग्लोव्हजला किती हादरे बसत होते, तो अनुभव त्यांनी सांगितला.
“मोहालीमध्ये आम्ही विजय हजारे ट्रॉफीची मॅच खेळत होतो. त्यावेळी पहिल्यांदा मी विकेटकीपर आणि स्लीप स्टम्पपासून बरेच लांब उभे असल्याच पाहिलं. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये बसलो होतो आणि उमरानचे चेंडू विकेटकीपरच्या ग्लोव्हजच्या तळव्याला बसत होते. तो आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. मी माझ्या करिअरमध्ये याआधी असं कधी पाहिलं नव्हतं” असं तन्मय श्रीवास्तवने सांगितलं. त्यावेळी जम्मू-काश्मीरचा रेल्वे विरुद्ध रणजी सामना होता. मुरलीधरनने उमरानला काय सांगितलं?
टॉम मुडी आणि मुथय्या मुरलीधरन हे सुद्धा SRH च्या कोचिंग स्टाफवर होते. ते सुद्धा उमरानच्या वेगाने प्रभावित झाले. “वेगाशी कधीही तडजोड करु नकोस. हे शस्त्र आहे, ज्याने तू कधीही फलंदाजावर दहशत निर्माण करु शकतोस” असा सल्ला त्यांनी दिला. उमरान मलिकने त्यांचा सल्ला ऐकला आणि आज त्याच करिअर एका वेगळ्या उंचीवर आहे.