वेस्ट इंडिजच्या स्टार ऑल राऊंडरचा मृत्यू, भारताविरुद्धच केलं होतं करियरमधलं बेस्ट प्रदर्शन
वेस्ट इंडिजने क्रिकेट (West Indies Cricket) जगताला एकापेक्षाएक सरस ऑलराऊंडर दिले. डेविड होलफोर्ड (David Holford) त्यापैकीच एक नाव.
मुंबई: वेस्ट इंडिजने क्रिकेट (West Indies Cricket) जगताला एकापेक्षाएक सरस ऑलराऊंडर दिले. डेविड होलफोर्ड (David Holford) त्यापैकीच एक नाव. वयाच्या 82 व्या वर्षी बारबाडोसमध्ये त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, डेविड होलफोर्ड बऱ्याच महिन्यांपासून आजारी होते. होलफोर्ड एक स्पिन ऑलराऊंडर होते. लेग स्पिनशिवाय (Leg spinner) ते मधल्याफळीत फलंदाजीला यायचे. 1966 ते 1977 दरम्यान ते वेस्ट इंडिजसाठी 24 कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी 51 विकेट घेतल्या. त्याशिवाय 768 धावा केल्या. भारताविरोधातच गोलंदाजीत त्यांनी सर्वोत्तम प्रदर्शन केलं. 1975 साली बारबाडोस कसोटीत त्यांनी भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजचं प्रतिनिधीत्व करण्याशिवाय त्यांनी 1970 च्या दशकात बारबाडोसचं कर्णधारपदही भूषवलं होतं. त्याशिवाय 5 शेल शील्ड किताबही जिंकून दिले होते. त्रिनिदाद एंड टोबॅगोचं कर्णधारपदही त्यांनी भूषवलं होतं. शील्ड टूर्नामेंटमध्ये त्यांनी 1हजार धावा आणि 100 विकेट घेतल्या. 1978 साली कॅरी पॅक सीरीजमध्येही ते खेळले होते.
अनेक संस्मरणीय इनिंग्स खेळले
इंग्लंड विरुद्ध ऑल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 1966 साली ऑलराऊंडर म्हणून त्यांनी आपलं सर्वोत्तम प्रदर्शन केलं होतं. त्यांनी गॅरी सोबर्ससोबत 127 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर लॉडर्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटीत त्यांनी 105 धावांची इनिंग खेळून कसोटी वाचवली होती. त्या कसोटीत फक्त 95 धावात वेस्ट इंडिजचे पाच विकेट पडले होते. त्यानंतर ते शतकीय इनिंग खेळले व सोबर्स सोबत मिळून 260 धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजने ती सीरीज 3-1 ने जिंकली होती.
भारताविरुद्ध 23 धावात 5 विकेट
होलफोर्ड यांनी भारताविरुद्ध सर्वोत्तम प्रदर्शन केलं होतं. 1975 साली बारबाडोस कसोटीत त्यांनी 23 धावा देऊन 5 विकेट काढल्या होत्या. त्यांच्या या कमालीच्या खेळाच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताला एक डाव आणि 97 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं.
चंद्रपॉलचं टॅलेंट ओळखलं
वेस्ट इंडिजसाठी क्रिकेट खेळ्ण्याशिवाय पुढे जाऊन ते सिलेक्शन पॅनलचे चेअरमनही बनले. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे चेअरमन म्हणून शिवनारायण चंद्रपॉल त्यांचा सर्वात मोठा शोध आहे. त्यांनी चंद्रपॉलमधील प्रतिभा हेरली व त्याला वेस्ट इंडिजच्या संघात स्थान दिलं.