T20 वर्ल्डकपनंतर 18 वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम देणार, ICC च्या 3 ट्रॉफी जिंकणाऱ्या चॅम्पियन्सची मोठी घोषणा
वेस्ट इंडिजचा सुपरस्टार खेळाडू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषकानंतर, म्हणजेच स्पर्धेतील वेस्ट इंडिजचा प्रवास संपताच त्याट दिवशी त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला तो पूर्णविराम देईल.
मुंबई : वेस्ट इंडिजचा सुपरस्टार खेळाडू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषकानंतर, म्हणजेच स्पर्धेतील वेस्ट इंडिजचा प्रवास संपताच त्याट दिवशी त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला तो पूर्णविराम देईल. गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर स्वत: ब्राव्होने याबद्दलची माहिती दिली. कॅरेबियनचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने समालोचक अॅलेक्स जॉर्डन यांच्याशी फेसबुक लाइव्ह केलं. यावेळी संवाद साधताना ब्राव्हो म्हणाला की, ‘आता निर्णयाची अंतिम वेळ आली आहे. माझ्या मते निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे’.
ब्राव्हो म्हणाला, माझ्या मते निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. माझं करिअर चांगलं होतं. 18 वर्षे वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे ही मोठी गोष्ट आहे. यादरम्यान अनेक चढउतारही पाहायला मिळाले. पण मी कधीच मागे वळून पाहिले नाही. माझ्या कारकिर्दीत 3 आयसीसी ट्रॉफी जिंकणे ही मोठी कामगिरी होती. ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 मध्येही त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती परंतु 2019 मध्ये पुन्हा तो निर्णय मागे घेतला.
ब्राव्होची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
ब्राव्हो 2012 आणि 2016 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 6 नोव्हेंबरला टी-20 सामना म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तो आतापर्यंत वेस्ट इंडिजकडून 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, ज्यात त्याने 1245 धावा केल्या आहेत आणि 78 विकेट्स घेतल्या आहेत. 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्राव्होने आतापर्यंत वेस्ट इंडिजसाठी एकूण 293 सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला तर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकूण सामन्यांची संख्या 294 होईल.
वेस्ट इंडीजचे भविष्य मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये उज्ज्वल
ब्राव्हो म्हणाला की, “मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजचे भविष्य खूप उज्वल आहे असे मला वाटते. आम्हाला फक्त युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याची गरज आहे. क्रिकेटमध्ये छबी तयार करणं कठीण आहे. मी माझ्या 70, 80 आणि 90 च्या दशकातील महान खेळाडूंचा आभारी आहे, त्यांना खेळताना पाहून मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.
हे ही वाचा :
T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर