U19 World Cup 2022: हिशोब चुकता केला! बांगलादेशला लोळवून टीम इंडियाचा दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश
गतविजेत्या बांगलादेशला नमवून युवा टीम इंडियाने दोन वर्षांपूर्वी अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
U19 World Cup 2022: भारताच्या युवा संघाने दिमाखात अंडर 19 वर्ल्डकपच्या (U19 World Cup) उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. काल अँटिंग्वा येथे झालेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात युवा टीम इंडियाने बांगलादेशवर (India vs Bangladesh) 115 चेंडू आणि पाच गडी राखून विजय मिळवला. गतविजेत्या बांगलादेशला नमवून युवा टीम इंडियाने दोन वर्षांपूर्वी अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत बांगलादेशने भारताला पराभूत करुन अंडर 19 वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले होते. उपांत्यफेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. बांगलादेशने दिलेल्या 112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पाच विकेट गमावल्या. कर्णधार यश धुल (Yash dhull) नाबाद (20) आणि कौशल तांबे नाबाद (11) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
गोलंदाजांनी चोख काम केलं
कर्णधार यश धुलचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. त्यांनी अख्ख्या बांगलादेशच्या टीमला 111 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे भारताला सोपं लक्ष्य मिळालं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर हरनुन सिंगला दुसऱ्याच षटकात तंझीम हसन साकीबने भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवलं. त्यानंतर अंगक्रिष रघुवंशी आणि शेख राशिदने डाव सावरला.
दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी 70 धावांची भागीदारी केली. रिपॉन मंडलने ही जोडी फोडली. त्याने रघुवंशीला (44) धावांवर बाद केलं. पुढच्याच चेंडूवर त्याने सेट झालेल्या राशिदला सुद्धा (26) धावांवर बाद केलं. सिद्धार्थ यादव (6) आणि राज बावाला भोपळाही फोडू न देताना मंडलने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अखेर धुल आणि तांबेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
All Over: Sealed with a SIX
India U19 have advanced to the semi-final of #U19CWC with a 5-wicket win over Bangladesh U19 in Antigua! #BoysInBlue #INDvBAN
Details – https://t.co/GJsWrPDzdJ pic.twitter.com/tkt6xC3qD9
— BCCI (@BCCI) January 29, 2022
रवी कुमार सर्वात यशस्वी गोलंदाज
भारताकडून रवी कुमार सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सात षटकात 14 धावा देत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. विकी ओस्तवालने आपल्या फिरकीच्या तालावर बांगलादेशी फलंदाजांना नाचवलं. त्याने दोन विकेट घेतल्या. कौशल तांबे, राजवर्धन, आणि अंगक्रिष रघुवंशीने प्रत्येकी एक विकेट घेतला. दोन फलंदाज धावबाद झाले. भारताला तुलनेने सोपे लक्ष्य मिळाले
West indies under 19 world cup India beat bangladesh by five wickets & enter into semifinal