पाकिस्तानात मॅचच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने ठोकल्या 506 धावा, इथे भारतात झाले 583 रन्स
भारतात पहिल्याच दिवशी कुठल्या टीमने धावांचा हा डोंगर रचला? आणि कुठल्या टुर्नामेंटमध्ये हे घडलं?
नवी दिल्ली: पाकिस्तान दौऱ्यात इंग्लंडच्या टीमने कमाल केली. पहिल्याच दिवशी त्यांनी अनेक रेकॉर्ड्स तोडले. कसोटी क्रिकेटच्या पहिल्यादिवशी आतापर्यंत जे झालं नाही, ते इंग्लंडच्या टीमने करुन दाखवलं. इंग्लंडच्या टीमने रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दिवशी 506 धावा ठोकल्या. टेस्ट क्रि्केटमध्ये पहिल्याच दिवशी हा नवीन इतिहास आहे. इंग्लंडच्या टीमने तिथे दूर पाकिस्तानात हा विक्रम रचला. त्याचवेळी भारतातही स्थानिक क्रिकेट स्पर्धेत एका टिमने पहिल्याच दिवशी 583 धावा चोपल्या.
भारतात कुठल्या टीमने ही कामगिरी केली?
इंग्लंडने पाकिस्तान टीम विरुद्ध 506 धावा केल्या. त्यापेक्षा 77 धावा जास्त भारतात एका टीमने बनवल्या. तुम्ही विचार करत असाल, हे कुठल्या स्पर्धेत आणि कुठल्या टीमने ही कामगिरी केली. या प्रश्नाच उत्तर आहे, विजय मर्चेंट ट्रॉफी. मुंबईची अंडर 16 टीम आणि मिजोरमच्या अंडर 16 टीममध्ये सामना सुरु आहे. तिथे पहिल्याच दिवशी धावांचा हा डोंगर पहायला मिळाला.
दोन बॅट्समननी झळकवली डबल सेंच्युरी
मुंबईच्या अंडर 16 टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी मिजोरमची गोलंदाजी फोडून काढली. पहिल्याच दिवशी 90 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 583 धावा केल्या. मुंबईच्या अंडर 16 टीमने ही विशाल धावसंख्या उभारली, त्यात दोन फलंदाजांनी डबल सेंच्युरी झळकवली. यात एक बॅट्समनने शतक झळकावलं.
1 सेंच्युरी आणि 2 द्विशतक
मुंबईच्या अंडर 16 टीमचा ओपनर वरदने 147 चेंडूंचा सामना केला. त्याने 121 धावा केल्या. ओपनिंग विकेटसाठी त्याने अभिनव साहासोबत मिळून 50 ओव्हर्समध्ये 222 धावा केल्या. वरद आऊट झाल्यानंतर क्रीजवर विकेटकीपर फलंदाद अभिज्ञान उतरला. त्याने 110 चेंडूत नाबाद 211 धावा केल्या. त्याने त्याच्या आक्रमक बॅटिंगमध्ये 29 चौकार आणि 8 षटकार लगावले.
दुसऱ्या विकेटासाठी अभिज्ञान आणि अभिनवमध्ये 244 चेंडूत 361 धावांची भागीदारी झाली. अभिज्ञानप्रमाणे अभिनवने डबल सेंच्युरी झळकवली. त्याने 287 चेंडूत नाबाद 237 धावा केल्या.
इंग्लंड आणि मुंबईची टीम पहिल्याच दिवशी 500 धावांच्या पार
इंग्लंडने पाकिस्तान विरुद्ध 506 धावा केल्या. मुंबईच्या अंडर 16 टीमने मिजोरम विरुद्ध 583 धावा फटकावल्या. दोन्ही सामन्यांमध्ये काही समानता आहेत. इंग्लंडच्या टीमकडून पहिल्याच दिवशी 4 शतकं झळकावली. तेच मुंबईच्या अंडर 16 टीमने 2 डबल सेंच्युरी आणि 1 शतक झळकावलं.