Abrar Ahmed: कुराणसाठी क्रिकेट सोडलं, डेब्यु टेस्टमध्ये इंग्लंडची वाट लावणारा अबरार अहमद कोण आहे?
वडिलांनी रोज 20 तास टॅक्सी चालवून कुटुंबाच पालनपोषण केलं.
लाहोर: इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. मुल्तानमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सेशनमध्ये पाकिस्तानने पाच विकेट काढल्या. हे पाचही विकेट डेब्यु करणाऱ्या अबरार अहमदच्या नावावर आहेत. पहिल्याच कसोटी सामन्यात अबरारने आपल्या फिरकीची जादू दाखवली.
सेहवागची तुफानी बॅटिंग पाहली
अबरारच्या घरात लहानपणापासून क्रिकेटच वातावरण होतं. त्याच्या वडिलांना क्रिकेटची आवड होती. त्याचा भाऊ शहजाद खान देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अबरार वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला लागला. मुल्तानच्या मैदानात त्याने सेहवागचा तुफानी खेळ पाहिला होता. मॅच पाहता-पाहता तो गोलंदाजाच्या चूका दाखवत होता.
अबरारला आलिम बनवण्याची इच्छा
वडिलाच्या उलट त्याच्या आईला अबरारला आलिम बनवायचं होतं. वयाच्या 9 व्या वर्षी आईच्या इच्छेखातर त्याने कुराण पठन केलं. दोन वर्षांसाठी क्रिकेटपासून लांब गेला. त्यानंतर आईने अबरारला इस्लामिक सायन्सचा अभ्यास करायला सांगितला. अबरारला स्वत:ला आलिम नाही, तर क्रिकेटर बनण्याची इच्छा होती. पहिल्यांदाच अबरारने आईला कुठल्या गोष्टीसाठी नकार दिला होता.
वेस्ट इंडिजचा खेळाडू आदर्श
24 वर्षाचा अबरार लहानपणापासून वेस्ट इंडिजचा खेळाडू सुनील नरेनला आपला आयडॉल मानायचा. वयाच्या 19 व्या वर्षी तो पाकिस्तानी टीममध्ये आला. अबरारला त्यावेळी अब्दुल कादिर कोण? हे माहित नव्हते. सकलेन मुश्ताकसह संपूर्ण टीमने यावरुन त्याची खिल्ली उडवली होती. कादिर यांची पाकिस्तानच्या सर्वोत्तम लेग स्पिनरमध्ये गणना होते.
दोन वर्ष मैदानापासून लांब
वर्ष 2016 मध्ये अबरारने झोनल अंडर-19 टुर्नामेंटमध्ये 53 विकेट काढल्या. त्यानंतर कराची किंग्सने त्याला संधी दिली. पीएसएलमध्ये खेळताना त्याला फ्रॅक्चर झालं. ज्यामुळे तो दोन वर्ष मैदानापासून लांब होता. या दरम्यान वडिलांनी त्याला साथ दिली. त्याचा आत्मविश्वास वाढवला. अबरारचे वडिल रोज 20 तास टॅक्सी चालवून कुटुंब चालवायचे. अबरारने टीममध्ये पुनरागमन केल्यानंतर सिनियर टीममध्ये जागा बनवली.