Who is Kuldeep sen: शेवटच्या षटकात LSG च्या डेंजरस मार्कस स्टॉयनिसला रोखणारा हा नवीन कुलदीप कोण आहे?
RR vs LSG: मार्कस स्टॉयनिसची बॅटिंग पाहून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju samson) काहीवेळासाठी नक्कीच टेन्शनमध्ये आला होता.
मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्समधला (RR vs LSG) कालचा सामना रंगतदार झाला. मार्कस स्टॉयनिसची बॅटिंग पाहून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju samson) काहीवेळासाठी नक्कीच टेन्शनमध्ये आला होता. त्यात भर म्हणजे आवेश खानने युजवेंद्र चहलच्या चेंडूवर सिक्स मारुन सुरुवात केली. सध्याच्या सीजनमध्ये युजवेंद्र चहलकडे पर्पल कॅप आहे. सीजनमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात सहा बाद 165 धावा केल्या. लखनौला विजयासाठी 166 धावांचे टार्गेट दिलं होतं. अखेरच्या षटकांमध्ये सामना रोमांचक वळणार असताना राजस्थान रॉयल्सच्या प्रसिद्ध कृष्णाने एका ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या. पाच स्पेशलिस्ट बॉलर्सपैकी चौघांचा कोटा संपल्याने संजू सॅमसनकडे कुलदीप सेन (Kuldeep sen) शिवाय दुसरा पर्याय नव्हता.
कुलदीप सेन समोर धोकादायक मार्कस स्टॉयनिस होता
कुलदीप शेवटच षटक टाकण्याआधी इन फॉर्म ऑलरांऊडर दीपक हुड्डाची विकेट काढली होती. शेवटचं षटक टाकणं हे नवख्या कुलदीप सेन समोरही मोठं आव्हान होतं. आयपीएल डेब्यु करणाऱ्या कुलदीप सेन समोर धोकादायक मार्कस स्टॉयनिस होता. कुलदीपने रनअप घेतला, समोर आवेश खान होता. सेनने फुल टॉस चेंडू टाकला. आवेश खानने एक धाव काढून स्टॉयनिसला स्ट्राइक दिला. स्टॉयनिस फटकेबाजी करत होता. त्यामुळे अटी-तटीच्या सामन्यात तो विजय मिळवून देईल, असं वाटत होतं. त्याने 17 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. यात दोन चौकार आणि चार षटकार होते.
पण कुलदीपने हुशारीने गोलंदाजी केली. त्याने वाईड यॉर्कर चेंडू टाकला. स्टॉयनिसने मारलेला फटका कव्हर्समधल्या खेळाडूच्या हातात गेला. त्यानंतर स्टॉयनिसने फाइन लेगला स्कूप करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पॅडला लागला. लक्ष्य अजूनही लखनौच्या दृष्टीपथात होतं.
तीन चेंडूत 14 धावांची आवश्यकता
तीन चेंडूत 14 धावांची आवश्यकता होती. कुलदीपने ऑफ स्टम्पच्या थोडा बाहेर चेंडू टाकला. तो चेंडू निर्धाव गेला. 223.53 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करणाऱ्या स्टॉयनिसला टाकलेले तीन चेंडू निर्धाव होते. शेवटच्या दोन चेंडूत विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. दोन चेंडूवर षटकार-चौकार ठोकून दहा धावा काढल्या. अशा प्रकारे पदार्पणातच कुलदीप सेनने दबावाच्या क्षणी उत्तम गोलंदाजीच कौशल्य दाखवलं. 2021-22 च्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत कुलदीप सेनने चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याची संघात निवड करण्यात आल्याच कॅप्टन संजू सॅमसनने सांगितलं.
View this post on Instagram
कुठल्या राज्याकडून खेळतो?
कुलदीप सेन मध्य प्रदेशसाठी खेळतो. आयपीएलमध्ये डेब्यु करण्याआधी त्याने 7.75 च्या सरासरीने पाच सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत. तो टी-20 चे 18 सामने खेळला असून 12 विकेट काढल्या आहेत.