रवी शास्त्रींची जागा कोण घेणार? न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी मिळणार उत्तर, चार माजी क्रिकेटपटूंची नावं चर्चेत
येत्या काळात बीसीसीआयची व्यस्तता वाढणार आहे, ज्याचे एक प्रमुख कारण म्हणजे टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाचा शोध. बीसीसीआय लवकरच नवीन प्रशिक्षक शोधण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे वृत्त आहे.
मुंबई : टीम इंडियाचा (Team India) पुढील प्रशिक्षक कोण असेल? या मोठ्या प्रश्नाचे उत्तर लवकरच सापडणार आहे. येत्या काळात बीसीसीआयची व्यस्तता वाढणार आहे, ज्याचे एक प्रमुख कारण म्हणजे टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाचा शोध. बीसीसीआय लवकरच नवीन प्रशिक्षक शोधण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. यासाठी अर्ज मागवण्यासाठी ते या आठवड्याच्या अखेरीस जाहिरात देऊ शकतात. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाव्यतिरिक्त सपोर्ट स्टाफसाठीही अर्ज मागवले जातील. भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांचा कार्यकाळ टी -20 विश्वचषकानंतर संपत आहे.
टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधाबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने InsideSport.in शी बोलताना सांगितले की, “न्यूझीलंड मालिकेपूर्वी आमच्याकडे नवीन प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी असतील. यासाठी, या आठवड्याच्या अखेरीस, आम्ही एक जाहिरात प्रसिद्ध करू शकतो. भारताची न्यूझीलंडविरुद्धची घरच्या मैदानांवर खेळवली जाणारी मालिका 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. म्हणजेच, ही मालिका दुबईमध्ये टी – 20 विश्वचषकाची अंतिम लढत झाल्यानंतर केवळ 3 दिवसांनी खेळवली जाईल.
रवी शास्त्रींच्या जागेसाठी कोण-कोण दावेदार?
टीम इंडियामध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जागी एक नाही तर अनेक दावेदार समोर आले आहेत. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नावेही या शर्यतीत पाहायला मिळाली. पण, प्रत्येकजण द्रविडला प्रशिक्षक बनवण्यासाठी तयार असताना, त्याला स्वतःला या भूमिकेत रस वाटत नाही. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी अनिल कुंबळेच्या नावाचीही चर्चा झाली. पण त्याच्या नावावरही सहमती होताना दिसत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट बोर्डानेच याबाबतीत फारसा रस दाखवला नाही.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी परदेशी नावांचाही विचार केला जाईल. ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी यांनी टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त आहे. टॉम मूडी सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे संचालक आहेत. याशिवाय ते श्रीलंका क्रिकेटचे संचालक देखील आहेत. याआधी श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेचे नावही चर्चेत होते, पण त्याने यात रस दाखवला नाही.
इतर बातम्या
IPL 2021 मधला RCB चा प्रवास संपुष्टात, ग्लेन मॅक्सवेलने शेअर केली मन की बात, ‘त्या’ लोकांना इशारा
IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज