IND vs SA : अर्शदीप सिंगवर सूर्यकुमार यादव का भडकला? बसमध्ये झापत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेत जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शतक, तर कुलदीप यादवने 5 गडी बाद केले. मात्र असं सर्व असताना हॉटेलवर जातान सूर्यकुमार यादव संतापलेला दिसला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका 1-1 बरोबरीत पार पडली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवून आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त खेळीचं प्रदर्शन करत मालिका 1-1 ने बरोबरी सोडवली. या विजयात सूर्यकुमार यादवचं शतक, यशस्वी जयस्वालचं अर्धशतक आणि कुलदीप यादवच्या पाच गड्यांचा समावेश होता. मालिकेत सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाचं कौतुक झालं. मैदानात एकदम कूल अंदाजात सूर्यकुमार यादव कॅप्टन्सी करताना दिसला. पण मैदानाबाहेर सूर्यकुमार यादवचं रौद्र रूप पाहायला मिळालं. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव अर्शदीप सिंगवर संतापलेला दिसत आहे. इतकंच काय तर हातवारे करत त्याने बरंच काही सुनावल्याचं दिसत आहे. सूर्यकुमार यादव इतका संतापलेला होता की त्याला कोणीतरी कॅमेऱ्यात चित्रित करतंय याचं देखील भान नव्हतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं. व्हिडीओमध्ये सरळ सरळ सूर्यकुमार यादव अर्शदीप सिंगला खडे बोल सुनावताना दिसत आहे. मात्र सूर्याचा हा राग नेमका कशासाठी ते मात्र कळू शकलेलं नाही. मात्र सामन्यातील काही चुकांबाबत खडसावलं असावं असा अंदाज नेटकरी व्हिडीओखाली व्यक्त करत आहेत.
Suryakumar Yadav intense reaction to Arshdeep Singh following the third T20I against South Africa 👀#SAvsIND #SuryakumarYadav #CricketTwitter pic.twitter.com/HvYLsyIcKQ
— OneCricket (@OneCricketApp) December 15, 2023
अर्शदीप सिंग तिसऱ्या टी20 सामन्यात हवी तशी कामगिरी करू शकला नाही. उलट महागडा ठरल्याने टीम इंडिया गोत्यात येऊ शकली असती. अर्शदीपने दोन षटकात 15.50 च्या सरासरीन 31 धावा दिल्या आणि एकही गडी बाद करता आला नाही. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्याकडे तिसरं षटक सोपवलंच नाही. त्यावरून त्याला ऐकवलं तर नसेल ना! याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. कारण हा व्हिडीओ तिसऱ्या टी20 सामन्यानंतरचा आहे.
टी20 वर्ल्डकप 2024 च्या दृष्टीने आता प्रत्येक टी20 मालिका महत्त्वाची आहे. या मालिकांमधून खेळाडूंची निवड करणं सोपं होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया पराभूत केलं. तर दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली.