Mumbai Indians ने एकाही सामन्यात अर्जुन तेंडुलकरला का खेळवलं नाही? कोचने सांगितलं कारण
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) खेळवलं नाही. निदान एकातरी सामन्यात अर्जुनचा खेळ पाहण्याची संधी मिळेल, अशी क्रिकेट रसिकांना अपेक्षा होती.
मुंबई: IPL 2022 च्या यंदाच्या सीजनमध्ये खराब प्रदर्शनामुळे Mumbai Indians चा संघ तळाला राहिला. मुंबई इंडियन्सने या मोसमात अनेक नवख्या खेळाडूंना संधी दिली. पण सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) खेळवलं नाही. निदान एकातरी सामन्यात अर्जुनचा खेळ पाहण्याची संधी मिळेल, अशी क्रिकेट रसिकांना अपेक्षा होती. पण अर्जुन तेंडुलकरला शेवटपर्यंत संधी मिळालीच नाही. मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपये मोजून अर्जुन तेंडुलकरला विकत घेतलं होतं. मुंबई इंडियन्सने सीजनमधील 14 सामन्यात रमणदीप सिंह, संजय यादव, कुमार कार्तिकेय. डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्बस यांना संधी दिली. सात-आठ सामन्यानंतर अर्जुन तेंडुलकरच्या नावाची चर्चा भरपूर होती. पण त्याला मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने संधी दिली नाही.
22 वर्षांचा अर्जुन स्थानिक संघ मुंबईसाठी फक्त दोन सामने खेळला आहे. टी 20 मुंबई लीगमध्येही अर्जुन खेळला. तुलनेने अर्जुनकडे अनुभवाची कमतरता आहे. शेवटच्या वानखेडेवरील सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला. त्यावेळी अर्जुनला संधी मिळेल, असं अनेकांना वाटलं होतं.
शेन बाँड काय म्हणाले?
अर्जुनला प्लेइंग 11 मध्ये का संधी मिळाली नाही, त्यावर मुंबई इंडियन्सचे कोच शेन बाँड यांनी आपलं मत मांडलं. शेन बाँड यांच्या मते अर्जुनला अजून आपल्या बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अर्जुनला अजून आपल्या खेळात सुधारणा करुन, संघात स्थान मिळवावं लागेल, असं बाँड यांचं मत आहे.
अर्जुनला काय मेहनत करावी लागेल?
“जेव्हा तुम्ही मुंबईसारख्या संघासाठी खेळता, तेव्हा मुंबईच्या संघात समावेश होणं, हा एक भाग आहे आणि प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवणं, ही दुसरी गोष्ट आहे. अर्जुनला अजून भरपूर मेहनत आणि सुधारणा करण्याची गरज आहे. तुम्ही जेव्हा या स्तरावर खेळता, तेव्हा तुम्हाला संघात तुमची जागा निर्माण करावी लागते” असं शेन बाँड म्हणाले. “अंतिम 11 मध्ये स्थान मिळवण्याआधी अर्जुन आपलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीवर मेहनत घ्यावी लागेल” असं बाँड यांनी सांगितलं.